आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राने ‘आरएसएस’चा छुपा अजेंडा वापरू नये, पंढरपूरच्या पत्रकार परिषदेत आठवलेंचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आरक्षणहा संविधानाने दिलेला अधिकार आहे. जर कुणाच्या सांगण्यावरून दिलेले आरक्षण काढून घेण्याचा केंद्र शासनाकडून प्रयत्न झाला तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख तथा खासदार रामदास आठवले यांनी दिला. केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा वापरू नये. जर देशातील जातिव्यवस्था संपुष्टात आणली तर आम्ही देखील शासनाला आरक्षण परत देऊ असेही त्यांनी सांगितले.

सांगोला तालुक्यातील भागाची पाहणी करून सोमवारी (दि. २१) पंढरपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड आदी उपस्थित होते. जर पानसरेंच्या हत्येसंदर्भात सनातन संस्थेविरोधात पोलिसांकडे ठोस पुरावे असतील तर शासनाने सनातन वर बंदी घातली पाहिजे, असे आठवले म्हणाले.

रिपाइंच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २५ लाखांची मदत
दुष्काळग्रस्तांसाठीरिपब्लिकन पक्षाच्या वतीने २५ लाखांची मदत दिली जाणार आहे. राज्यातील आमदारांनी, खासदारांनी स्वत:चे दोन महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांसाठी द्यावे. राज्य शासनाने दुष्काळाची व्याख्या बदलली पाहिजे. दुष्काळासंदर्भात पश्चिम महाराष्ट्रावरील अन्याय रिपब्लिकन पक्ष कदापीही सहन करणार नाही. पूर्वी ज्यांना आरक्षण दिले आहे, ते परत घेण्याच्या भानगडीत केंद्राने पडू नये. महामंडळे वाटपासंदर्भात शिवसेना भाजपने आपसातील मतभेद लवकर मिटवावेत. घटक पक्षांना देखील त्यामध्ये योग्य स्थान द्यावे. सोलापूर जिल्ह्याला दोन महामंडळे मिळणार आहेत, असे आठवले म्हणाले.

...तर आंदोलन करू
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी स्वातंत्र्यानंतर दिलेल्या आरक्षणासंदर्भात शासनाने ‘समिती नेमून आरक्षण लाभाचे सिंहावलोकन करावे’ अशा केलेल्या विधानावर श्री. आठवले म्हणाले, आरक्षण हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. आरक्षण देण्यासाठी समिती नेमून ते द्यावे किंवा देऊ नये या बाबत निर्णय घ्यावा. मात्र दिलेले आरक्षण काढून घेण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. शासनाला जशास तसे उत्तर देऊ. जर देशातील जातिव्यवस्था संपुष्टात आणली जाणार असेल तर आम्ही देखील आमचे आरक्षण शासनाला परत करू असेही त्यांनी सांगितले.