आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी अंक 25 टक्क्यांनी महागले, जीएसटीचा परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - जाहिराती मिळत नाहीत, प्रिटिंग परवडत नाही, नवीन वाचक नाही, वाचनाची अभिरूची बदललेली. अशा कारणांमुळे दिवाळी अंक आधीच कमी झाले. त्यात यंदा वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीने महाग करून ठेवले. हंस, मोहिनी, नवल या अंकाची किंमत तब्बल चारशे रुपये झाली आहे. दोनशे रुपयांचा ‘आवाज’ अडीचशे रुपयांपर्यंत गेला. त्यामुळे दिवाळीच्या झगमगाटात या अंकांचा ‘आवाज’ क्षीण झाल्याचे दिसून येते. 
 
दिवाळीच्या खुसखुशीत फराळासोबत दिवाळी अंकांची मजा काही आैरच असते. जत्रा, हा..हा..हा, मौज, श्यामसुंदर, मार्मिक या विनाेदी अंकांतील व्यंगचित्रे वर्तमान स्थितीवर नेमके भाष्य करत असतात. नर्मविनोदी लेखनाने निखळ मनोरंजन होते. त्यामुळे दिवाळी अंकांची सर्वांना आतुरता असते. परंतु ते दिवस आता गेले...आता वाचनाची अभिरूची बदलली आहे. मधल्या काळात आरोग्य, योगा, आयुर्वेद आणि ज्योतिषी या विषयांना वाहिलेल्या अंकांना मागणी होती. परंतु त्याला अपेक्षित व्यवसाय नसल्याने त्या ई-पटलावर आल्या. त्याचे अॅप निघाले. शंभर रुपये देऊन डाऊनलोड केले, की अख्खा अंकच मोबाइलवर येऊ लागला. परिणामी बाजारातील अंक संपला. आता जे अंक येत आहेत, ते निवृत्तांसाठी. निखळ विनोदी आणि मर्मभेदी. त्याला चांगली मागणी असल्याचे विक्रेते प्राणेश आैरंगाबादकर सांगतात. 
 
ई-वाचन वाढल्यानेअंक कमी झाले. त्यात जीएसटीने अंक महाग करून ठेवले. तरीही विनोदी, आरोग्यविषयक अंकांना मागणी आहे. महिलांसाठी असलेल्या अंकांचीही मागणी काही कमी झालेली नाही. 
- प्राणेश आैरंगाबादकर, विक्रेते 
 
पूर्व विभाग वाचनालयात १५० रुपयांत १०० अंक 
पूर्वविभाग सार्वजनिक वाचनालयाने १५० रुपयांत १०० दिवाळी अंक १०० दिवस वाचण्याची योजना दिली आहे. वाचकांना दिवाळी अंक अल्प मोबदल्यात वाचावयास मिळावे. दिवाळीत साहित्याची मेजवानी सर्वांपर्यंत पोचावी, या उद्देशाने ही सेवा सुरू केल्याचे सांस्कृतिक विभागप्रमुख माणिक सारंगी यांनी सांगितले. वाचकांना २५० रुपयांची अनामत रक्कम ठेवावी लागेल. अंक व्यवस्थित परत केले तर रक्कम परत मिळेल. 
 
अंकांतील ठळक 
महिला : गृहशोभा,रागिणी, सासर-माहेर, गृहिणी, मानिनी, मेनका, अलका, वसुधा, रंभा आणि सौंदर्यस्पर्श. 
आरोग्य: हृदयमित्र,चाळिशीनंतरचे आरोग्य, योगासने-प्राणायाम, आयुर्वेद, वनौषधी, शतायुषी, दीर्घायु आदी. 
विनोदी: श्यामसुंदर,हाहाहा, मार्मिक, आवाज, जत्रा (सर्व अंकांमध्ये मोदींची व्यंगचित्रे अतिशय बोलकी) 
संगीत: ‘स्वरप्रतिभा’या अंकाचे मुखपृष्ठ हृदयनाथ मंगेशकरांचे आहे. संगीत रसिकांसाठी अप्रतिम अंक. 
साहित्य: ‘साहित्यशिवार’ या नावाने अंक असून, त्याच्या मुखपृष्ठावर विंदा आहेत. त्याखाली त्यांची कविता. 
राजकारण: ‘वास्तव’या नावाने राजकारणावर हा अंक अाहे.,निवडणुकांपलीकडचे राजकारण यावर अंक भाष्य करतो. 
बातम्या आणखी आहेत...