आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दान हे माणसाला नादान बनवते; कामाने योगदान ठरते! प्रिसिजन पुरस्कार प्रदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘दानहे नादान बनवते, कामानेच सामाजिक कार्यात योगदान ठरते,’ हे बाबा आमटे यांचे ब्रीदवाक्य घेऊनच कामाला सुरुवात केली. अंध, अपंगांच्या पुनर्वसनासाठी त्यांचीच प्रेरणा असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक हरिश्चंद्र सुडे (बुधोडा, जि. लातूर) यांनी रविवारी स्पष्ट केले. त्यांच्या ‘स्वाधार’ केंद्राला प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

‘प्रिसिजन गप्पा’ या कार्यक्रमाच्या समारोपात हा पुरस्कार देण्यात आला. लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह असे याचे स्वरूप आहे. संस्थेच्या अंध बांधवांकडे तो सुपूर्त करण्यात आला. कर्णबधिरांसाठी काम करणारे भांगे दांपत्य योगेश आणि जयाप्रदा भांगे यांच्या संस्थेला लाख रुपये देण्यात आले. मराठी चित्रसृष्टीतील कलावंत सचिन खेडेकर सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. शिवछत्रपती रंगभवनमध्ये झालेल्या सोहळ्यास उद्योग अन् सामाजिक क्षेत्रातील लोकांची उपस्थिती होती. सभागृहाइतकीच गर्दी प्रवेशद्वाराबाहेरच्या मैदानात होती. तिथे स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी प्रास्ताविक केले. या वेळी प्रिसिजन कॅमशाफ्टसचे अध्यक्ष यतीन शहा उपस्थित होते.

आनंदवन हीच प्रेरणा
१९६९सालच्या गांधी जयंतीला सामाजिक कार्यास सुरुवात झाली. ७४ मध्ये बाबांच्या आनंदवनात जाण्याचा प्रसंग आला. त्यानंतर कार्याला दिशा मिळाली. स्पर्शज्ञानातून अंधांना स्वावलंबी बनवण्याचे काम करतो. त्यातून अनेक अंध, अपंग उभे राहिले.” हरिश्चंद्र सुडे, समाजसेवक

उलगडली बाबांची करुणा
पुरस्कारवितरणानंतर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या साहित्यावर आधारित करुणोपनिषदे हा कार्यक्रम झाला. सोनाली कुलकर्णी यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात अभिनेता सचिन खेडेकर, चंद्रकांत काळे, गायिका अंजली मराठे सहभागी झाले होते. त्यांना नरेंद्र भिडे यांनी हार्मोनियमवर तर अपूर्व द्रविड यांनी तबल्यावर साथ केली. बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या कार्यक्रमाची रचना करण्यात आली. गीत, संवादाच्या माध्यमातून बाबांचे कार्य उलगडण्यात आले. त्याला सोलापूरकरांनी जोरदार टाळ्या देऊन प्रतिसाद दिला. वि. स. खांडेकर, पु. लं. देशपांडे बाबांच्या कामाचे वर्णन कसे करीत, हेही त्यातून सांगण्यात आले.

बुधोडा (जि. लातूर) येथील स्वाधार केंद्राला प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन रविवारी गौरवण्यात आले. संस्थेतील स्वावलंबी दृष्टिहीनांकडे हा निधी सुपूर्त करताना अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. या वेळी संस्थेचे संस्थापक हरिश्चंद्र सुडे, ‘प्रिसिजन’चे यतीन शहा आणि डॉ. सुहासिनी शहा. दुसऱ्या छायाचित्रात सामाजिक कृतज्ञता पुरस्कार स्वीकारताना योगेश आणि जयाप्रदा भांगे मुलगा प्रसून.

इतरांची घुसमट नाही
प्रसून कर्णबधिर असल्याचे ऐकून आम्ही कोसळलोच. केवळ कर्णयंत्र लावल्याने तो बोलणार नाही, तर त्याला स्पीच थेरपी करावी लागली. त्यानंतर वर्ष-सव्वा वर्षांनी तो बालू लागला. माझ्या सारखी घुसमट इतरांची होऊ नये, यासाठी कामाला सुरुवात केली.” जयाप्रदा भांगे, सामाजिक कार्यकर्त्या