आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑइलचा पुरवठा बंद; डीपी दुरुस्ती रखडली, ऊस उत्पादक अडचणीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - निसर्गाने भरभरून पाण्याचे दान दिले असतानाही शेतकऱ्यांच्या अडचणी संपण्यास तयार नाहीत. ऑइलचा पुरवठा बंद झाल्यामुळे शेतील वीजपुरवठा करणाऱ्या अनेक डिपी दुरुस्तीअभावी महावितरणकडे पडून आहेत. यामुळे ऊस उत्पादकांची कोंडी झाली आहे. सध्याच अशी परिस्थिती असताना नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाण्याची गरज असताना यापेक्षा तीव्र परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 
 
जिल्ह्यात बऱ्यापैकी पावासाने सर्व प्रकल्प तुडुंब भरले आहेत. नद्या, ओढे नाल्यांमधूनही पाणी वाहत आहे. विहिरी कूपनलिकांना पाणी आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील चार वर्षांपासून उसापासून दूर गेलेला शेतकरी पुन्हा ऊस उत्पादनाकडे वळत आहे. अनेक ठिकाणी ऊस लागवडीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. यामुळे यावेळी घटलेल्या उसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ऊस उत्पादकांच्या अाकांक्षेला महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे लगाम बसत आहे. ऑगस्टपासून नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम ठप्प झाले आहे. दुरूस्तीसाठी विशिष्ट आॅइलची गरज असते. अशा आइलचा पुरवठाच मागील काही दिवसांपासून बंद आहे. यामुळे यंत्रणा उपलब्ध असूनही ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीसाठी अडचणी येत आहेत. शेतकरी दुरूस्तीसाठी सातत्याने महावितरणच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्यांना आइल नसल्याचे कारण सांगून परत पाठवले जात आहे. सध्या पावसाचे वातावरण असले तरी ऊस उत्पादकांना याचा फटका बसत आहे. विशिष्ट कालावधीच्या टप्प्यानंतर उसाला पाणी द्यावे लागते. सप्टेबर महिन्यात जिल्ह्यात मुसळधार पावासाने प्रकल्प, तलाव, ओढे तुडूंब भरले आहेत. ऊसासोबतच रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिकांनाही पाणी देणे गरजेचे असल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून मिळणे गरजेेचे झाले आहे. 
 
यामुळे ऑईलचा तुटवडा 
ट्रान्सफार्मरमध्ये वापरण्यात येणारे आॅईल उच्च प्रतीचे असते. कॉपर ब्लेड तारांचे वातावरण नियंत्रित ठेवण्याचे काम ऑईल करते. याची बाजारात किंमत अधिक आहे. स्थानिक स्तरावरून कंत्राटदारांना दुरूस्तीसाठी आॅईल पुरवले जात नाही. वरिष्ठ कार्यालयातून याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, तेथेच ऑईलची खरेदी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
शेकडो डीपी दुरुस्तीविना पडून 
दुरुस्तीसाठी उस्मानाबाद ग्रामीण उपविभागात २० डीपींचे ट्रान्सफॉर्मर पडून असल्याचे महाविरण कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र, वास्तवात दुरुस्तीच्या प्रतीक्षेतील ट्रान्सफॉर्मरचा आकडा मोठा असू शकतो. अनेक शेतकरी कार्यालयात दुरुस्तीसाठी डीपी आणण्याबाबत विचारणा करत आहेत. मात्र, त्यांना अगोदरचेच डीपी पडून असल्याचे उत्तर मिळत आहे. 
 
..तर बिकट परिस्थिती 
सध्यापावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी देणे बंद आहे. मात्र, ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तसेच नोव्हेंबरदरम्यान पाण्याचा वापर वाढणार आहे. त्यावेळी मात्र, शेतकरी यासाठी आक्रमक होणार आहेत. अशी परिस्थिती निर्माण होऊ देण्यासाठी आॅइल मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याची गरज आहे. अन्यथा गतवर्षीपेक्षा परिस्थिती बिकट बनणार आहे. 
शेतक-यांची अडचण होऊ देणार नाही 

वरिष्ठपातळीवरून ऑइल मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आठवड्यात आॅइल मिळाल्यानंतर ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यात येतील. शेतकऱ्यांना अडचण येऊ दिली जाणार नाही. 
- एस.एस. रेकुलवार, उप कार्यकारी अभियंता (ग्रामीण) 
बातम्या आणखी आहेत...