आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Problems Of Sugarcane, No More Sugarcane For Factory

उसाचा प्रश्न: माळशिरस तालुक्यात आता होणार उसाची पळवापळवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज- दुष्काळी स्थितीत पशुधन वाचवण्यासाठी चारा उपलब्ध व्हावा, या हेतूने सरकारने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. परंतु पाण्याअभावी जळू लागलेला ऊस आणि चाऱ्यासाठी तोडणीमुळे कमी होऊ लागलेले उस क्षेत्र पाहता माळशिरस तालुक्यातील कारखान्यांची सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून बाॅयलर पूजनाची घाई सुरू आहे. उसाचे घटलेले क्षेत्र आणि माळशिरसमधील कारखान्यांची संख्या पाहता यंदाच्या गाळप हंगामात उसाची पळवापळवी होणार, हे निश्चित.
२०१४-१५ च्या हंगामात देशात २८४ लाख मेट्रिक टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. ऑक्टोबर २०१४ मध्ये मागील ७७ लाख मेट्रिक टन साखर शिल्लक होती. देशात एकूण ३६१ लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहिल्यामुळे २०१४-१५ मध्ये साखरेचे दर कोसळल्याचा गंभीर परिणाम झाला. त्यातच सरकारने एफआरपी सक्ती केल्याने आर्थिक क्षमता नसलेल्या साखर कारखान्यांचे कंबरडे मोडले.
माळशिरसमध्ये पाच कारखाने आहेत. त्यापैकी सहकारमहर्षी, शंकरनगर आणि पांडुरंग, श्रीपूर हे कारखाने क्षमतेने आणि उसाच्या क्षेत्राने मोठे आहेत. दोन्ही कारखान्यांनी प्रत्येकी १० लाख टन ऊस गाळपाचा अंदाज धरला आहे. जादा आणि रोख बिल देणाऱ्या कारखान्याकडे शेतकरी आकृष्ट होतील. त्यामुळे कारखाने ऊस पळवण्याआधी शेतकरी अशा कारखान्यांना प्राधान्य देतील. कमी क्षमतेच्या कारखान्यांची सभासद संख्या उसाचे क्षेत्रही कमी आहे. त्यामुळे चाऱ्यासाठी तोडलेला ऊस, जळालेला ऊस असा हिशेब केल्यास कमी क्षमतेच्या कारखान्यांचा गाळप हंगाम ४० ते ५० दिवसही चालेल की नाही, याची शंका आहे.
यंदा १० लाख टन ऊस गाळप करण्यात येईल
- सरकारनेसुमारे ४० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट ठरवले आहे. त्यामुळे २०१५-१६ मध्ये साखरेच्या दरात किंचित वाढ होऊन दर स्थिर होतील, असा अंदाज आहे. या हंगामात ऊस गाळपासाठी कारखान्यांत स्पर्धा असेल. १५ ऑक्टाेबरपासून कारखाने सुरू होण्यासाठी परवानगीची शक्यता आहे. सभासद आमचा एकमेकांवर विश्वास आहे. त्यामुळे या वेळेस १० लाख टन ऊस गाळप करू.
राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक, सहकारमहर्षी कारखाना
तुटलेला किती, जळालेला किती...
- माळशिरस तालुक्यात नोंदीनुसार सुमारे २५ हजार हेक्टर ऊस आहे. त्यापैकी चाऱ्यासाठी तुटलेला ऊस आणि जळालेला ऊस याचे किती प्रमाण आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. एकूण ऊस क्षेत्राच्या सुमारे ३५ टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन आहे.
राहुल जितकर, तालुकाकृषी अधिकारी, माळशिरस
बाहेरचा ऊस घेणार नाही
- गतवर्षी १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट होते. यंदा ऊस कमी आहे. तरीही सुमारे नऊ ते १० लाख टन ऊस गाळप होईल. त्याची पळवापळवी होईलच. जे कारखाने चांगला दर देतील त्यांच्याकडे ऊस घालण्याचे प्रमाण अधिक असेल. नोंदणी झालेला सर्व ऊस पांडुरंगलाच मिळेल. आमचे सभासद इतर कारखान्यांना कदापि ऊस देणार नाहीत. आम्हीही बाहेरचा ऊस घेणार नाही.''
यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखाना