आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिकांबद्दल अवमानकारक वक्तव्य; उमरगेकर उतरले रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा - भारतीय सैनिकांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या पंढरपूर येथील आमदार प्रशांत परिचारक यांची आमदारकी रद्द करून त्यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी येथे सोमवारी (दि.२७) माजी सैनिक संघटनेच्या वतीने हजारो सैनिकांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मारकापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारादरम्यान पंढरपूर येथील भाजपपुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी विरोधकांची खिल्ली उडविताना चक्क देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांबद्दल अवमानकारक बेताल वक्तव्य केले. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून भारतीयांचे रक्षण करणाऱ्या सैन्य दलाची बदनामी केली आहे. आमदार परिचारक यांच्या वक्तव्याचा माजी सैनिक संघटनेच्या वतीने निषेध करीत आहोत, त्यांनी माफी मागून चालणार नाही, असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी परिचारक यांची आमदारकी रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. 

मोर्चामध्ये महिलांनीही मोठा सहभाग नोंदवत परिचारकांचा निषेध केला. 
हजारोंचा सहभाग : हुतात्मास्मारकापासून काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो माजी सैनिक, सीमेवर कार्यरत सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी झाले. ‘आमदार परिचारक यांचा निषेध असो, आमदारकी रद्द झालीच पाहिजे, देशद्रोही व्यक्तव्य करणाऱ्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा करा, भारत माता की जय’, आदी घोषणांनी शहर दणाणले. 

निषेध सभा : यावेळीझालेल्या निषेध सभेत शहाजी चालुक्य, प्रशांत पाटील, प्रा. सुनीता चावला, प्रा. शौकत पटेल, हरीश डावरे, यशवंत कदम, सुधाकर पाटील, विष्णूपंत खंडागळे आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी सैनिक संघटनेच्या मोर्चाला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड यांच्यासोबत तुरोरी उमरगा येथील व्यापारी महासंघाने बाजारपेठ बंद ठेवून पाठिंबा दिला.
 
व्यापाऱ्यांकडून निषेध, आंदोलनास पाठिंबा 
उमरगा व्यापारी महासंघाने सोमवारी (दि.२७) दुपारी एकपर्यंत दुकाने बंद ठेवून आमदार परिचारक यांचा निषेध केला. सैनिकांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. आंदोलनात माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. उमरगा-लोहारा, तुळजापूर तालुक्यातील माजी, आजी सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य मोर्चामध्ये सहभागी झाले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...