आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी लंकेश यांच्या खुन्यांना तत्काळ अटक करा, समविचारी संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारतीय समाजात अनेक शतकांपासून अनेक विचारप्रवाह आढळतात. त्यामध्ये वैचारिक संघर्षदेखील मोठा झाला. पण त्याला कधीच हिंसक वळण मिळाले नाही. पण मागील काही वर्षांपासून सातत्याने विचारवंतांच्या हत्या होत आहेत. बंगळुरू येथील पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्याही त्याच हत्यांची साखळी आहे. लंकेश यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी सोलापुरातील जवाब दो आंदोलन बुधवारी कृती समिती आणि समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात आले. 
 
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगभरात भारतीय लोकशाहीकडे आदराने पाहिले जाते. भारतीय संस्कृतीला आदर्शवत मानले जाते. अशा समाजामध्ये विचारवंतांच्या हत्या होणे अत्यंत विघातक आहे. भारतीय समाजाने कधीही प्रतिगामी विचारांच्या शक्तींना थारा दिलेला नाही. पण मागील काही वर्षांमध्ये भारतीय समाजाची काही भांडवलदारांनी जातीयवादी शक्तींना हाताशी धरून दिशाभूल केली आहे. त्यामुळे प्रतिगामी शक्तींनी उचल खाल्ली आहे. भारतीय समाजाची अंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी या शक्तींना आवर घालणे गरजेचे आहे. 
 
पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी यांच्या हत्यांचा संपूर्ण तपास अद्याप पूर्ण झालेला नसताना लंकेश यांची हत्या झाली आहे. लंकेश यांच्यामुळे ज्यांच्या हिताला बाधा पोहोचत होती. त्या प्रतिगामी शक्तींनीच ही हत्या घडवून आणली आहे. त्यामुळे त्याच दिशेने विशेष तपास पथकाद्वारे तपास करण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी अॅड. गोविंद पाटील, यशवंत फडतरे, हसीब नदाफ, दत्ता चव्हाण, फारुख शेख, मनीष गडदे, किशोर झेंडेकर, पूुजा कांबळे, मीरा कांबळे, पूजा बनसोडे यांच्यासह सोलापूर शहरातील समविचारी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
आंबेडकर पुतळ्याजवळ उद्या आक्रोश 
विचारवंतांच्यासातत्याने होत असलेल्या हत्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. यामध्ये सोलापुरातील सर्व पुरोगामी संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन जवाब दो आंदोलन कृती समितीने केले आहे. तसेच शुक्रवारी अकरा वाजता फडकुले सभागृह येथे बैठक होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...