आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजभारनियमनाचे चटके असह्य; उस्मानाबादेत मनसेचे आंदोलन, वाशीकर अचानक आक्रमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्ह्यात भार नियमनाचा मोठा घोळ सुरू आहे. कोठेही, कधीही वीज खंडित केली जात आहे. निश्चित वेळापत्रक नसल्यामुळे जिल्ह्यात महावितरणच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये उद्रेक निर्माण झाला आहे. शनिवारी (दि. १६) मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात जोरदार निदर्शने केली. कोणताही अधिकारी नसल्यामुळे किटकॅट उपसून फेकून दिले. यामुळे कार्यालयातील वीज बंद पडली. तसेच लोहारा वाशी येथेही रोष व्यक्त करण्यात आला. 
 
अनियंत्रित भारनियमनामुळे वीज वितरणाचा बोजवारा उडाला. भारनियमनाच्या नावाखाली कधीही वीज बंद केली जात आहे. यामुळे आता जिल्ह्यात विविध ठिकाणी महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. भारनियमन बंद करण्याची मागणी करण्यासाठी शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अधीक्षक अभियंता कार्यालयात गेले. मात्र, तेथे एकही अधिकारी उपस्थित नव्हता. सर्वच खुर्च्या रिकाम्या असल्याचे पाहून कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी अधीक्षक अभियंता यांच्या रिकाम्या खुर्चिला निवेदन प्रतिकात्मकरित्या दिले. 

जिल्ह्यात विजेचा खेळखंडोबा सुरू असताना महावितरणच्या मुख्य कार्यालयातच सर्व दिवे पंखे अधिकारी, कर्मचारी जागेवर नसताना सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषनाबाजी करत सर्व किटकॅटच उपसून टाकले. यामुळे काहीकाळ वीज बंद झाली. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांना पळापळ करून किटकॅट मिळवावे लागले. नंतर वीज सुरू करावी लागली. या आंदोलनामध्ये मनसेचे दादा कांबळे, अभिजित पतंगे, राहुल बचाटे, हेमंत पाठक, अमरराजे कदम, गणेश जगताप, तन्मय वाघमारे, सौरभ देशमुख, विशाल कांबळे, आदित्य लगदिवे आदींनी भाग घेतला. लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे वीज का बंद केली अशी विचारणा करत महावितरणच्या साहाय्यक अभियंत्याला संतप्त जमावाने धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच कंट्रोल रूमला कुलूप लावले. शुक्रवारी रात्री उशिरा एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सास्तुर येथील महावितरणचे विद्युत सहाय्यक शाखा अभियंता लक्ष्मण कांबळे विद्युत ऑपरेटर कार्यालयात कार्यालयीन कामकाज करीत बसले होते. राजेगाव (ता. लोहारा) येथील दीपक बब्रुवान देशमुख यांनी अभियंत्यावर रोष व्यक्त केला. तसेच येथील कंट्रोल रुमला टाळे ठाेकले. वाशी येथेही संत्पत जमावाने रात्रीच कार्यालयात जाऊन विचारणा केली. 
 
पुढारी, शासकीय कार्यालयांचा भार 
थकबाकीदारांत राजकीय पुढारी आणि शासकीय कार्यालयांसह सर्वसामान्यही आहेत. वसुली होत नसल्याने थकबाकी वाढतेय. बिल भरणाऱ्यांमुळे नियमित ग्राहकांचीही विनाकारण गैरसोय होत आहे. 
 
पडताळणीअभावी फाॅल्टी मीटरचा ढीग 
तांत्रिकबिघाड असलेले ग्राहकांचे मीटर तपासणीसाठी महावितरण कार्यालयात आणले आहेत. अशा १००-१५० मीटरचा ढीग महावितरण कार्यालयात पडून आहे. संबंधित मीटरची तपासणी करून विजबिलाच्या तक्रारी तत्काळ दूर करण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्राहकांची इच्छा असूनही वीजबिलाचा भरणा होत नाही आणि महावितरणच्या चुकांचा फटका ग्राहकांना बसत आहे. 
 
रात्रीच्या काळोखाने नागरिक त्रस्त 
भारनियमनामुळे एकत्र जेवण, विद्यार्थ्यांचा अभ्यास, विरंगुळा नागरिक हरवून बसले. विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. डासांच्या उपद्रवामुळे आजारांमध्ये वाढ होण्याचीही शक्यता आहे. 
 
मागणीप्रमाणे वीज 
रोजच्या मागणीप्रमाणे गावठाणाला वीजपुरवठा होतो. यामुळे याची नियोजित प्रसिद्धी करता येत नाही. तसेच कृषीपंपाच्या भारनियमनाचे नियोजन करण्यात आले आहे. - श्रीकांतपाटील, अधीक्षक अभियंता. 
 
१० प्रकारचे फिडर 
जिल्ह्यात ४५९ फिडरने वीजपुरवठा होतो. यात ८७ फिडर गावठाणाचे आहेत. वसुली वीज गळतीनुसार ११ प्रकारात वर्गीकरण करण्यात येते.प्रत्येक फिडरवर भारनियमन केले जाते. वसुलीनुसार यामध्ये बदल होतो. मात्र, सध्या वीजनिर्मिती कोलमडली. वीजनिर्मिती आवाक्यात आल्यावर भारनियमन लवकर बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
योग्य नियोजनाचा अभाव 
मुंबई येथील लोड कंट्रोल सेलमधून भारनियमासाठी विनानियोजन सातत्याने संदेश येत आहेत. यामुळे जिल्हा यंत्रणेला नेमके वीजपुरवठा करण्याचे नियोजन करणे अशक्य होत आहे. परिणामी जिल्ह्यात कोठेही, केव्हाही वीज बंद केली जात आहे. कोणताही कर्मचारी नागरिकांना व्यवस्थित माहिती देत नाही. यामुळे संभ्रमाच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. 
 
उस्मानाबादकरही काळोखात; बिलवसुलीत समाधानकारक चित्र असतानाही शहरात भारनियमन 
मीटर जंप होणे, अचानक अधिक बिल, मीटर नादुरुस्त असणे आदी ग्राहकांचे वीजबिल अडकले असल्याने थकबाकीचा आकडा अधिक फुगला आहे. आपले वीजबिल चुकीचे असल्याचा समज झाल्यावर त्यांच्या वीजबिलाचा आकडा आवाक्याबाहेर जातो. त्यामुळे अशा ग्राहकांना नंतर वीजबिल भरणे शक्य होत नाही. चुकीच्या, वाढीव बिलावरुन वीज कर्मचाऱ्यांचे ग्राहकांसोबत वाद होतात. असे प्रसंग टाळण्यासाठी कर्मचारी, अधिकारी वादग्रस्त ग्राहकांकडे वसुलीसाठी जात नाहीत. परिणामी, थकीत वीजबिलाचा आकडा दिवसेंदिवस वाढतो. याचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. तक्रारी दूर करण्याची गरज आहे. 
बातम्या आणखी आहेत...