आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाच्या गुन्ह्यात नातलगांना गोवणाऱ्या आरोपीस जन्मठेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- अनोळखी व्यक्तीचा खून करून या खुनाच्या प्रकरणात नातलगांना गोवणाऱ्या रत्नापूर (ता. कळंब) येथील एकास अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी जन्मठेप दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २० डिसेंबर २०१३ रोजी उस्मानाबाद तालुक्यातील शेकापूर शिवारात घडली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेकापूर शिवारात दि. २० डिसेंबर २०१३ रोजी प्रशांत शिनगारे यांच्या शेतात बाभळीच्या झाडाखाली एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती शिनगारे यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याला दिली होती. त्यानुसार प्रथम अकस्मात म्हणून नोंद घेण्यात आली. परंतु, पंचनाम्यादरम्यान सदरील व्यक्तीचा दगडाने अथवा अज्ञात शस्त्राने डोक्यात घाव घालून खून केल्याचे समोर आले. यावेळी सदरील व्यक्तीच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली. यामध्ये या प्रकरणातील आरोपी महेश वसंत चिलवंते (३०, रा. रत्नापूर) याच्या नातलगांची नावे आढळून आली. याप्रकरणी वि. च. काळे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिस निरीक्षक बालासाहेब गावंडे तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांनी तपासाला दिशा दिली. यामध्ये चिठ्ठीत नावे असलेल्या व्यक्तींचा या प्रकरणात काहीच संबंध नसून महेश चिलवंते यानेच सासरच्या मंडळींना यामध्ये गोवण्यासाठी खिशात चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समोर आले. त्यानुसार दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, महेश चिलवंते हा फरार झाला. दुसरीकडे खून झालेल्या व्यक्तीचीही ओळख पटत नव्हती. परंतु, या सर्व प्रकरणात पोलिसांनी कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पुरावा नसताना परिस्थितीजन्य पुराव्यावरून हे प्रकरण खंबीरपणे न्यायालयात उभे केले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, हस्ताक्षर तज्ज्ञ, फिर्यादी, तपासीक अंमलदार उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. याची दखल घेऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी आरोपी महेश चिलवंते याला दोषी ठरवून आजन्म कारावास हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. तसेच दंड भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने शासकीय अभियोक्ता दीपक पाटील-मेंढेकर यांनी बाजू मांडली, त्यांना शरद लोंढे यांनी सहकार्य केले.

या खटल्यातील महत्त्वाची बाब म्हणजे ज्या व्यक्तीचा खून झाला, त्या व्यक्तीची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी महेश चिलवंते हाही सतत पोलिसांना हुलकावणी देत फिरत असताना महिनाभरापूर्वीच त्याला अटक करण्यात आली होती. अशाही परिस्थितीत पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे यामध्ये महेश चिलवंतेचे हस्ताक्षर महत्त्वाचा पुरावा ठरला. पोलिसांनी या प्रकरणातील अारोपीला शिक्षा ठोठावण्याइतपत पुरावे सादर केल्याने तपास अधिकारी शासकीय अभियोक्त्यांचे कौतुक होत आहे.