आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोटोकॉल बाजूला ठेवून सांगताे, ‘सुशीलकुमार प्रेरणादायी’-राज्यपाल सी. विद्यासागर राव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘राज्यपाल असलो तरी मी अाज प्रोटोकॉल बाजूला ठेवून बोलतोय. सुशीलकुमार शिंदे यांना दिलेल्या मानपत्रातून त्यांचा प्रेरणादायी प्रवास लक्षात येतो. कधीकाळी  पेपर टाकणारा मुलगा अाज राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचू शकतो, चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकतो. उपेक्षित वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे सुशीलकुमार शिंदे देशाच्या गृहमंत्रिपदापर्यंत पोहोचू शकतात. माझ्या मते भारतातील प्रगल्भ लोकशाहीमुळेच हे शक्य हाेते,’  असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी केले.   
 
सोलापूर विद्यापीठातर्फे बुधवारी विशेष दीक्षांत समारंभात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (डीलिट) ही मानद पदवी राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.  
 
सत्काराला उत्तर देताना शिंदे  म्हणाले, ‘सोलापूर विद्यापीठाची स्थापना करताना एका जिल्ह्यापुरते म्हणून काहींनी विरोधी सूर काढला खरा. पण अमेरिका, इतर पाश्चात्त्य देशांतही एका जिल्ह्यात चार-चार विद्यापीठे असतात. शिक्षणाची साधने तळागाळातील वर्गापर्यंत सहजासहजी पोहोचली पाहिजेत ही त्यामागील भावना अाहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत शिक्षणाचे महत्त्व वेळीच ओळखले पाहिजे.  याच विचारातून सोलापूर विद्यापीठ स्थापनेचे विधेयक तेव्हा संमत करून घेतले. खरे तर एका जिल्ह्यापुरते विद्यापीठ म्हटल्यावर राजकीय विरोधी सूर उमटला असता. म्हणून जेव्हा सगळे सदस्य आपापल्या मतदारसंघात परततात तेव्हा शुक्रवारी रात्री अाम्ही हे विधेयक विधान परिषदेत  मांडले. त्याच दिवशी विधानसभेतही संमत करून घेतले.  सोमवारी जेव्हा सभागृहात चर्चा झाली तेव्हा सगळ्यांना या विधेयकाच्या संमतीबाबत समजले. ही चतुराई नव्हती तर शिक्षणाचे साधन तळागाळातील वर्गापर्यंत सहज पोहोचले पाहिजे यासाठीची जाणीव मनात होती. सोलापुरात टॅलेंट आहे, पण त्याला एक्स्पोझर नाही. ही ज्ञानशक्ती देण्याचे कार्य विद्यापीठाच्या हातून होत आहे. या माध्यमातून विद्यार्थी प्रगतीची झेप घेतील.’
 
ही तर आईने दिलेली पदवी असल्याचे मानताे    
- मी सहा वर्षांचा असताना वडील वारले. अाता अाईही नाही. त्यामुळे तसा निराधारच आहे.  आता आई म्हणजे पत्नीच. सोलापूर विद्यापीठाने मला दिलेली पदवी ही आईकडून मिळालेली पदवीच मानतो. यापूर्वीही अनेक संस्था,  विद्यापीठांकडून मानद पदवी मिळाली; पण मी माझ्या नावापुढे डॉक्टरेट लावत नाही. कारण मानद पदवी वेगळी आणि  संशोधन करून, कष्टाने मिळालेली डॉक्टरेट पदवी ही वेगळी, असे मी मानतो. 
सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री  
बातम्या आणखी आहेत...