आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील रेल्वेचे जाळे २००० किमीने वाढणार, नऊ राज्यांत तिहेरीकरणाची कामे होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वेचे जाळे वाढवण्याच्या द़ृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे देशातील ९ राज्यांत ९ प्रकल्प राबवणार असून यामुळे देशांतर्गत रेल्वेचे जाळे सुमारे दोन हजार किमीने वाढणार आहे. यात महत्त्वाच्या रेल्वेमार्गावर तिसरी लाइन टाकण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २४ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. रेल्वेचे नेटवर्क वाढल्यामुळे परिसरातील उद्योग वाढीसही चालना मिळणार आहे.

रेल्वे प्रशासन देशातील ९ राज्यांत रेल्वे नेटवर्क वाढवण्याचे काम करत आहे. यात आसाम, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिसा आदी राज्यांचा समावेश आहे.
२००० किमीच्या या कामात सर्वात मोठे काम मथुरा ते झाशीदरम्यान होणार आहे. येथे सध्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण सुरू आहे. नव्या प्रकल्पात मात्र या मार्गाचे तिहेरीकरण केले जाणार आहे. सुमारे २७३ िकमीच्या तिहेरीकरणासाठी ४३७७ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. इटारसी ते नागपूरदरम्यान तिहेरी रेल्वेमार्ग टाकला जाणार आहे. यासाठी सुमारे २४४९ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. बल्लारशाह ते काझीपेठदरम्यानही तिहेरी लाइन टाकली जाणार आहे. २०१ किमीसाठी २४०० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे ५ वर्षे लागण्याची शक्यता आहे. झाशी ते बिनादरम्यान तिसरी लाइन टाकली जाईल. यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या मालगाड्यांना बराच फायदा होणार आहे. १५२ किमीच्या कामासाठी तीन वर्षे लागणार असून यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
विजयवाडा-गुडूर तिहेरीकरण होणार
विजयवाडा ते गुडूरदरम्यान रेल्वेमार्गाचे तिहेरीकरण केले जाणार आहे. यादरम्यान २८७.६७ किमी अंतरावर रेल्वेमार्ग टाकला जाईल. हे काम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे सहा वर्षांचा कालावधी लागेल. दक्षिण भारतात पोर्टची संख्या अधिक असल्याने येथे मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. तिसरी लाइन टाकण्यात येणार असल्याने मालवाहतुकीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी किमान ३८७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

रेल्वेचा नेटवर्क वाढवण्याचा संकल्प
^ज्या मार्गावरून दररोज धावणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. तसेच जे मार्ग प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, असे मार्ग निवडून त्या मार्गावर तिसरी लाइन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सुमारे २४ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित अाहे. वेगवेगळ्या राज्यांत ही कामे केली जाणार आहेत. एकूणच रेल्वे प्रशासनाने आपले नेटवर्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अनिलकुमार सक्सेना, मुख्य जनसंपर्क अधिकारी, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली.
२४ हजार कोटी रुपयांचा खर्च, आसाम, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांत होणार कामे, प्रवासी व मालवाहतुकीसाठी ठरणार महत्त्वाचे.
बातम्या आणखी आहेत...