आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिग्नलमध्ये बिघाड करून रेल्‍वे प्रवाशांना लुटले, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पुण्याहून जम्मूतावीला जाणाऱ्या झेलम एक्स्प्रेसच्या डब्यात घुसून चोरट्यांनी तीन प्रवाशांना लुटले आहे. यात तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, मनगटी घड्याळसह दोन मोबाइल घेऊन चोरांनी पोबारा केला. सिग्नल यंत्रणेत बिघाड निर्माण गाडी थांबवण्यात आली आणि मग गाडी थांबल्यानंतर चार चोरट्यांनी मिळून ही लूट केली. ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास श्रीगोंदा स्थानकाच्या होम सिग्नलवर घडली. यामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले होते.

 

पुण्याहून जम्मूला जाणारी झेलम एक्स्प्रेस दौंड स्थानकाहून सुटल्यानंतर श्रीगोंदा स्थानकाच्या होमसिग्नलवर पोहचली. यावेळी चोरट्यांनी सिग्नलमध्ये बिघाड करण्यासाठी प्रथम ट्रॅक सर्किटची वायर तोडली. सिग्नलवर झाडांचा पालापाचोळा लावण्यात आला. गाडी होमवर पोहचताच सिग्नल लाल झाला. गाडी थांबल्यानंतर चोरटे शयनयान दर्जाच्या डब्यात घुसले. दमदाटी करून आर. बी. दास, महेश हेगडे अन्य एक प्रवासी यांच्याकडचा एेवज चोरून डब्यातून पळ काढला.

 

डब्यातून उतरल्यानंतर चोरट्यांनी थेट उसाच्या शेतातून पळ काढल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. यानंतर गाडी अहमदनगर स्थानकावर आल्यानंतर आरपीएफने मनमाडपर्यंत गाडीला सुरक्षा पुरवली. घटनेची नोंद दौंड लोहमार्ग पोलिस स्थानकात झाली आहे.

 

वडशिंगे रेल्वे स्थानकाजवळ क्रॉसिंगसाठी थांबलेल्या मुंबई - हैदराबाद एक्स्प्रेसच्या प्रवाशांवर चोरट्यांनी हल्ला चढवला आणि बॅग पळवली. ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. मुंबई -हैदराबाद एक्स्प्रेस ही गडी वडशिंगे रेल्वे स्थानकाजवळ क्रॉसिंगसाठी थांबली होती. यावेळी जनरल कोचच्या फुटबोर्डवर अनेक प्रवाशी बसले होते. बेसावध बसलेल्या या प्रवाशांवर चोरट्याने चाकूने हल्ला केला. यात प्रेम भंडारी विजय शिंदे यांच्यावर चाकूने हल्ला झाला. यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच जखमी प्रवाशांवर रेल्वे डॉक्टरांनी उपचार केले. बॅगेत कपडे अन्य वस्तू होत्या. या प्रकरणी सचिन पवार, रा. पुणे यांनी कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...