आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्बो मालधक्का हटवून रेल्वे स्थानकाची नवी स्मार्ट इमारत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्ट सोलापूरचे स्मार्ट रेल्वे स्थानक साकारले जाणार आहे. विद्यमान स्थानकामागील जम्बो मालधक्क्याचे स्थलांतर करून तेथे नवी स्मार्ट इमारत बांधली जाणार आहे. तसेच, येथे एक नवा फलाटही बांधण्यात येणार आहे. येथून दक्षिण भारताकडे ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्या थांबणार आहेत. नवी इमारत येत असली तरी जुन्या स्थानकावरूनही सेवा सुरू राहणार आहे.
जुन्या मीटर गेजच्या जागी सोलापूर ते होटगीदरम्यान आणखी दोन रुळ टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. ही कामे एनटीपीसीच्या प्रकल्पातून केली जाणार आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वेकडे या कामांपोटी सुमारे एक हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

नव्या इमारतीतूनच प्रवाशांना स्थानकावर प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रवाशांना पादचारी पुलावरून चढण्याची गरज भासणार नाही. येथे फलाट क्रमांक बांधला जाणार आहे. याच फलाटावरून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्या सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाचे आहे. ही नवी इमारत सोलापूर स्थानकाची दुसरी महत्त्वाची इमारत ठरणार आहे. जम्बो मालधक्का स्थलांतर करून ते जुळे सोलापूर ते टिकेकर वाडीदरम्यान बांधले जाणार आहे. या मार्गावर रेल्वेची खूप मोठी जागा आहे. नवीन इमारत बांधताना ती अधिकाधिक प्रवाशांच्या सोयीची असेल याची काळजी घेतली जाणार आहे. नवे आरक्षण केंद्र, चालू तिकीट खिडकी, प्रवाशांना राहण्यासाठी खोल्या, शयन कक्ष, सामूहिक शयन कक्ष आदी प्रवासी सुविधा असणार आहे. नवीन इमारत बांधणे, फलाट बांधणे, नवे मालधक्का उभारणे आदी कामांसाठी सुमारे ८० ते १०० कोटीं रुपयांचा खर्च होणार आहे.

असा होईल फायदा
होटगीकुडगी येथे एनटीपीसीचे मोठे प्रकल्प तयार होत आहेत. हुबळी रेल्वे विभागाकडून कुडगी ते होटगी दरम्यान दुहेरीकरण केले जाणार आहे. या सोबतच होटगी ते सोलापूर मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. यामुळे गाड्यांना क्रॉसिंगला थांबावे लागणार नाही. सोलापूरहून नवीन रेेल्वेगाड्या सुरू होतील. मालधक्का शहरातून हटल्यामुळे प्रदूषणाचा स्तर कमी होईल. नवीन फलाटामुळे गाड्या थांबण्याची सुरू होण्याची स्थानकाची क्षमता वाढेल. सोलापूर स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील ताण हलका होईल. दमाणी नगर, देगाव परिसरातील नागरिकांना रामलाल चौकाला विळखा घाऊन येण्याची गरज भासणार नाही. प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन होईल. त्यामुळे स्थानकावरचा ताण कमी होईल.

‘दक्षिण पश्चिम’कडे रक्कम जमा
^दक्षिण पश्चिम रेल्वेकडे एनटीपीसीने सुमारे एक हजार कोटीरुपये जमा केले आहेत. या रकमेतूनच सोलापूर ते होटगी दरम्यानचे रुळाचे चौपदरीकरणाचे काम केले जाणार आहे. तसेच रामवाडीच्या बाजूने स्थानकासाठी नवीन इमारत बांधणे, नवा फलाट बांधणे आदी कामे केली जाणार आहे. यासाठी जम्बो मालधक्का हटवला जाणार आहे.” मनिंदरसिंगउप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...