आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाने औज बंधारा भरू लागला, शहराचा पाणीप्रश्न तूर्तास मिटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बुधवारी सायंकाळी पूर्वा नक्षत्राचा पाऊस बरसला. अवघ्या ५४.१ िम.मी. पावसाने शहर जलमय झाले. चौकाचौकांत पाण्यामुळे तळे साचले. मुसळधार पावसामुळे गरिबी हटाव झोपडपट्टी, तुरट गल्ली, सेटलमेंट फ्री काॅलनी, हंडे प्लाॅट, यतिम खाना परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरले. या ठिकाणी महापालिकेचे आपत्कालीन पथक उशिरा पोहोचले. पावसाळा सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनी पहिल्यांदाच पडलेल्या दमदार पावसात महापालिकेची यंत्रणा फेल ठरल्याचे स्पष्ट झाले.
शहरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. टप्प्याटप्प्याने सर्वत्र पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी साचले. शिवाजी चौक, जुना एम्प्लाॅयमेंट चौक, सम्राट चौक, नवी पेठ, शिंदे चौक परिसरातील सखल भागात पाण्याचे तळे साचले. अनेक ठिकाणी दोन ते अडीच फुटांपर्यंत पाणी वाहत असल्याने शहरातील वाहतूक संथगतीने सुरू होती.

औज बंधारा परिसरात बुधवारी मुसळधार पाऊस झाल्याने बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत बंधाऱ्यातील पाणीपातळी २.८ मीटरवर गेली होती. गुरुवारपर्यंत ती तीन मीटरपेक्षा वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराचा पुढील दोन महिन्यांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. औज ते सोलापूर या जलवाहिनीवरील पाच ठिकाणच्या गळती दुरुस्तीचे काम सुरू आहे. पावसामुळे कामात व्यत्यय आला. शहरातील पाणीपुरवठा रविवारपासून सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.

औज बंधारा परिसरात आणि कर्नाटक भागात पाऊस आहे. त्यामुळे पुढील दिवसांत बंधाऱ्यातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता तूर्तास तरी मिटली आहे. आता इतक्यात उजनी धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही. पुढील महिनाभर पुरेल इतका पाणीसाठी बंधाऱ्यात आहे.

दुबार पंपिंगची प्रक्रिया सुरू
उजनी धरणातील पाणीपातळीत वाढ झाल्यास तेथे दुबार पाणी उपसा करावा लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली असून, टेंडर प्रसिद्ध केले आहे. उजनी धरणात आता वजा टक्के पाण्याची पातळी असून ती वजा ३२ टक्के झाल्यास दुबार पंपिंग करावे लागेल.

यंत्रणा वेळेत पोहोचली नाही
शहरात मान्सूनपूर्व कामे करण्याबाबत महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्याबाबत आढावा बैठकाही घेण्यात आल्या. कामे पूर्ण झाल्याचा अहवाल झोन कार्यालयांकडून देण्यात आले. आपत्कालीन यंत्रणा २४ तास सतर्क असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. परंतु गरिबी हटाव, तुरट गल्ली, सेटलमेंट, हंडे प्लाॅट, यतिम खाना येथे अापत्कालीन यंत्रणा वेळेत पोहोचली नाही. दरम्यान, पावसामुळे कुठेही मोठी हानी झाली नसल्याचे आपत्कालीन विभागाचे शांताराम अवताडे यांनी सांगितले.

पाणीपुरवठा विभागात अधिकाऱ्यांची कमी
महापालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकारी रजेवर गेले आहेत. प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता दुलंगे हे आजारी आहेत. तरीही त्यांनी बुधवारी गळती दुरुस्ती कामाच्या ठिकाणी पाहणी केली. आर. एन. रेड्डी रजेवर गेले तर विजय राठोड निलंबित आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागात अधिकाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. ड्रेनेज विभागाचे यू. बी. माशाळे यांनी पाणीपुरवठा विभागात काम केले.

पाच ठिकाणी गळती
आैजते सोरेगाव दरम्यान जलवाहिनीस वडकबाळ, होनमुर्गी, टाकळी येथे पाच ठिकाणी गळती आहे. दुरुस्तीचे काम बुधवारी हाती घेण्यात आले. त्यासाठी सकाळी नऊपासून टाकळी पंप हाऊस येथील चारही पंप बंद करण्यात आले. टाकळी आणि वडकबाळ येथील गळतींची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. होनमुर्गीजवळील तीन गळतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना पाऊस आल्यामुळे काम थांबले. त्यामुळे रविवारपर्यंतचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मनपा प्रभारी नगर अभियंता गंगाधर दुलंगे यांनी दिली. दरम्यान, शहरातील चौपाडसह काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. बुधवारी पाणी आल्याने नागरिकांचे हाल झाले.