आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरात जोरदार हजेरी, जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - शहरात बुधवारी जोरदार तर तालुक्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, शहरात सुमारे सव्वातास जोराचा पाऊस कोसळत होता. त्यामुळे शहरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. गेल्या अनेक दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या या पावसाने आशा पल्लवित झाल्या आहेत. शहरात सुमारे ८० मिलिमीटर पाऊस झाल्याचे तहसीलदार गजानन गुरव यांनी सांगितले.

दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरात जोरदार तर तालुक्यातील काही गावांमध्ये कमीअधिक प्रमाणात पावासाला सुरुवात झाली. या पावसाने शहरातील सखल भागाला तळ्याचे स्वरूप आले होते. निम्मा पावसाळा संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शहरवासीयांसह तालुक्यातील शेतकरीही चिंतेत होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. मात्र, त्यात जोर नव्हता. बुधवारी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. शहरातील काळामारुती, चौफाळा, शिवाजी चौक, बकंटस्मामी मठ, घोंगडे गल्ली, तसेच सरगम सिनेमागृहाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.

बार्शी | शहरतालुक्यात बुधवारी रात्री चांगला पाऊस झाला. रात्री साडेआठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तासभर संततधार सुरू होती. तालुक्यातील वैराग, पांगरी यासह शहर परिसरातील भागात हा पाऊस झाला. रात्री साडेआठच्या सुमारास तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले.

उपळाई खुर्द (ता. माढा) येथे पावसाने ओढे, नाले, तलाव, भरले. रस्ते पाण्याखाली गेले.
माढा | शहरासहतालुक्यात दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू होती. तालुक्यात सर्वत्र कमीअधिक प्रमाणात पावसाने चांगली हजेली लावली. तालुक्यातील वेताळवाडी, रणदिवेवाडी, उपळाई खुर्द, विठ्ठलवाडी, वडाचीवाडी आदी गावांमध्ये कमीअधिक प्रमाणात पाऊस पडला. दिवसभरातील पावसाने उपळाई खुर्द येथील ओढे, नाले, तलाव भरले. तसेच रस्तेही पाण्याखाली गेले. या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सांगोला | सांगोलाशहरासह ग्रामीण भागात बुधवारी दुपारी तीनपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. शहरातील सखल भागात पाणी साचले. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्याच्या ग्रामीण भागात कमीअधिक प्रमाणात पाऊस आहे. पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त केले जात असले तरी अद्याप म्हणावा तसा पावसात जोर नाही. तालुक्यात सरासरी ३५ हून अधिक मिलिमीटर पाऊस पडला. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

मोहोळ | गेल्यादोन महिन्यांपासून ओढ दिलेल्या पावसाने बुधवारी पूर्वा नक्षत्रात हजेरी लावली. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शहरासह तालुक्यातील अनेक गावात दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दमदार पावसाची अपेक्षा होती. सायंकाळी सहापासून मोहोळ, पोखरापूर, सय्यद वरवडे, कुरूल, कामती, इंचगाव, घोडेश्वर, अर्धनारी, नरखेड या भागासह संपूर्ण तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

मंगळवेढा | शहरपरिसरात बुधवारी संध्याकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. रब्बी पेरणीच्या तोंडावर पावसाला सुरुवात झाल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे. जुन महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पाणी चाराटंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. बुधवारी दिवसभर कडक उन्हामुळे उकाडा होता. सायंकाळी आकाशात काळे ढग जमा झाले. मात्र जोराचा वारा सुटल्यामुळे ढग निघून गेले. सायंकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली. वातावरणात गारवा निर्माण झाला.

करमाळा | शहरपरिसरात बुधवारी हलक्या मध्यम सरी कोसळल्या. यामुळे बळीराजा सुखावला. शहरात सायंकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तालुक्यातील कुंभेज, झरे, देवळाली, जेऊर, बिटरगाव, जातेगाव, रावगव, रोशेवाडी, वीट, चिखलठाण, वाशिंबे, मांगी, भोसे, पोथरे, केत्तूर, केम, पारेवाडी यापैकी ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून आधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. सध्याच्या पावसाने
समाधानकारक स्थिती दिसत असली तरी दुष्काळी स्थिती संपण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. यामुळे तलाव, विहिरी, नदीत पाणी येऊ शकेल. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला. त्या पार्श्वभूमीवर पूर्वा नक्षत्राच्या पावसाने दिलासा दिला आहे. आणखी चांगला पाऊस झाल्यास रब्बी पेरणीच्या तयारीला सुरुवात होईल.

अक्कलकोट | शहरपरिसरात पूर्वा फाल्गुनी नक्षत्राने बुधवारी (दि. ९) सलग दुसऱ्या दिवशीही चांगला पाऊस झाला. बुधवारी सकाळी आठवाजेपर्यंत अक्कलकोट मंडल ६०, तडवळ २, जेऊर १२, मैंदर्गी १०, दुधनी ३, चप्पळगाव १४, वागदरी २, किणी १० मिलिमीटर असा एकूण ११३ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. शहर परिसरात पावसाचा जोर जास्त होता. त्यामानाने ग्रामीण भागात म्हणावा तसा सर्वत्र पाऊस नव्हता.
अक्कलकोटच्या ग्रामीण भागात नाही जोर
अनेक दिवसांपासून दडी मारलेला पाऊस गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोसळायला लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील माळशिरस वगळता अन्यत्र बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. बुधवारी माढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर येथे मुसळधार पाऊस पडला. बार्शी तालुक्यात सायंकाळी संततधार सुरू झाली.
दक्षिण सोलापूर |तालुक्यातील सर्वचभागात बुधवारी पावसाने हजेरी लावली. मंद्रूप, वळसंग होटगी या तीन भागांत कमीअधिक प्रमाणात हा पाऊस होता. काही ठिकाणी जोर होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. चारपासून सायंकाळी सातपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. मंद्रूप परिसरातील माळकवठे, निंबर्गी, भंडारकवठे भागात चांगला पाऊस झाला. जलयुक्त शिवार योजनेतील बंधारे या पावसाने भरले आहेत. दोन्ही तलावातील पाणी वाढले आहे. हत्तूर, वडकबाळ, बसवनगर परिसरात अनेक ठिकाणी या पावसाने बांध फुटून पाणी वाहिले.