आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने जून-जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये दिली हुलकावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सलग दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदाच्या वर्षी तरी मान्सून तारेल, अशी अपेक्षा असताना ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरविली आहे. जून जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये खूपच कमी २७ मि. मी. इतका पाऊस झाला आहे. जून, जुलै ऑगस्ट या तीन महिन्यात सरासरीपेक्षा ८४ मि. मी. पावसाची कमी नोंद झाली आहे. जुलै वगळता जून ऑगस्ट या महिन्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. जुलैमध्ये झालेल्या पावसाने यंदा तारले आहे, आता सप्टेंबरमध्ये येणाऱ्या रिटर्न मान्सूनवरच खरीप रब्बी पिकांचे भवितव्य अवलंबून आहे.

तालुकानिहाय आकडेवारीवर नजर टाकली असता दक्षिण सोलापूर तालुक्यात यंदा सर्वाधिक ३०८ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी दक्षिण तालुक्यात ८८.६१ मि.मी. इतकी नाेंद होती. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक २७८ मि.मी. नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक कमी पाऊस १४१ मि.मी. म्हणजेच फक्त ४३ टक्के मोहोळ तालुक्यात झाला आहे. मागील वर्षी मोहोळ तालुक्यात फक्त ८९ मि.मी. पाऊस झाला होता. उत्तर तालुक्यात मागील वर्षी १०२ मि.मी. नोंद होती. यंदा ऑगस्टअखेर २६९ मि.मी. पाऊस झाला आहे. बार्शी तालुक्यातही यंदा सरासरीच्या ६१ टक्के पाऊस झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला आहे.

अक्कलकोट तालुक्यात २५९ मि.मी. पाऊस झाला असून मागील वर्षी ११८ मि.मी. पाऊस झाला होता. माढा तालुक्यात मागील वर्षी १०० मि.मी. ची नोंद होती. यंदा २२३ मि.मी. नोंद झाली आहे. करमाळा तालुक्यात सरासरीच्या ६५ टक्के म्हणजे १९० मि.मी. पाऊस झाला असून मागील वर्षी ९५ मि.मी. इतकी नोंद झाली होती. पंढरपूर तालुक्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला असून मागील वर्षी ९० मि.मी. पाऊस झाला होता. माळशिरस तालुक्यात यंदा सरासरीच्या ९२ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी जिल्ह्यात सर्वात कमी ४८ मि.मी. पाऊस झाला होता. मंगळवेढा तालुक्यात २०२ मि.मी.ची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी ७८ मि.मी. पाऊस झाला होता.

ऑगस्टमध्ये सर्वात कमी
जून,जुलै ऑगस्ट या तीन महिन्यात जिल्ह्यात ३०७ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र ऑगस्टअखेरपर्यंत २२७ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यात फक्त २७.८२ मि.मि. इतक्या पावसाची नोंद आहे. जून महिन्यात ८८.७० मि.मी. तर जुलैमध्ये सर्वाधिक ११०.६४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले. मागील वर्षी ऑगस्टअखेर जिल्ह्यात पावसाने शंभरीही गाठली नव्हती. फक्त ९१.२१ मि.मी.पावसाची शासन दरबारी नोंद करण्यात आली होती.

ऑगस्टअखेर तालुकावार पाऊस
(कंसात मागील वर्षी)

उत्तर सोलापूर : २७२.२० (१०२.७६), दक्षिण सोलापूर : ३०८.१४ (८८.६१), बार्शी : २२२.८८ (११९.३९), अक्कलकोट : २५९.५६ (११८.७४), मोहोळ : १४१.५० (८९), माढा : २२४.७५ (१००.५२), करमाळा : १९०.९९ (९५.१०), पंढरपूर : २१०.११ (९०.८१), सांगोला : २७८.३० (७१.१२), माळशिरस : २१४.१० (४८.९१), मंगळवेढा : २०२ (७८.२७). एकूण : २२९.५१ (९१.२१).

... तर कृत्रिम पावसाचा विचार
जिल्ह्यात ऑगस्टमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊसच झालाच नाही. शेजारील जिल्ह्यांची आकडेवारी पाहता १०० टक्केपेक्षा अधिक पाऊस आहे. यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शासनस्तरावर मागणी करणार आहे. याबाबत शासनस्तरावरही विचार सुरू आहे. १५ सप्टेंबरनंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. रणजित कुमार,जिल्हाधिकारी
बातम्या आणखी आहेत...