आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारचा कर्जमाफीला बूच; भाजप, सेनेला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शेतकरी,विरोधकांनी केलेल्या आंदोलनानंतरही शासनाने ‘बूच’ लावून कर्जमाफी जाहीर केली. अटी शर्तींमुळेच शेतकऱ्यांवर बेजार होण्याची वेळ आली आहे. शासनातल्या कोणालाच शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नाही. दहा हजार रुपये आगाऊ कर्ज देण्याची घोषणा होऊनही अद्याप एकालाही पैसे मिळाले नाहीत. कर्जमाफीवर संशय निर्माण होत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. 
 
उस्मानाबादेत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी (दि. १८) घेण्यात आली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, राहुल मोटे, जीवनराव गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, पंचायत समितीचे सभापती बालाजी गावडे आदींची उपस्थिती होती. 

पवार म्हणाले, राज्यात अभूतपुर्व शेतकरी आंदोलन झाल्यानंतर कर्जमाफी देण्यात आली आहे. मात्र, कर्जमाफी देताना विचित्र निकष लावण्यात आले. यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतो की काय, अशी शंका येत आहे. सध्या बैलजोडीच लाखाला मिळत आहे. त्याच पैशात जुने वाहन मिळत आहे. शेतकऱ्याच्या पोराने वाहन खरेदी करून मालवाहतूक करून पोट भरले तर याच कारणावरून त्याला शासन कर्जमाफीतून बाद करणार आहे. तसेच कुटुंबातील एकाने टपरी, चहाचे हॉटेल, पंक्चर काढण्याचे दुकान सुरू करण्यासाठी शॉप अॅक्टचा परवाना घेतला असेल तर त्यालाही कर्जमाफी मिळणार नाही. शासन अशा जाचक अटी लावून कर्जमाफीपासून वंचित ठेवत आहे. सध्याच्या शासनाच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. आता तर विवाहासाठी पैसा नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलीही आत्महत्या करत आहेत. तरीही शासनाचे डोके ठिकाणावर आलेले नाही. दहा हजार रुपये आगावू कर्ज देण्याची घोषणा करून आठवडा होत आहे. तरीही कोणालाही अद्याप पैसे देण्यात आलेले नाहीत. पैसे देण्याची घोषणा करताना शासनाने खरिपाचे बियाणे, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैसा देत आहोत, असे सांगितले होते. आता राज्यातील काही भागात वापसा मोडत आहे. पेरण्या झालेल्या नाहीत. तरीही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळालेे नाहीत. खरे पाहिले तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काहीही देणे - घेणे नसलेले लोक शासनात बसले आहेत. कंेद्र शासनाने तर अगोदरच कर्जमाफीचा भार राज्याने उचलण्याबाबत सांगितले. इतकी आंदोलने झाली तरीही कृषिमंत्री कोठेही दिसले नाहीत. केंद्रीय कृषिमंत्री तर रामदेव बाबांसोबत योगा करण्यात मग्न अाहेत, असा टोलाही पवार यांनी लगावला. 

११ मागण्यांसाठी लढा 
तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी ११ मागण्यांसाठी लढा देणार आहे. यापुढे पक्षाच्या युवक आघाडीत २८ ते ३२ तर विद्यार्थी आघाडीत २२ ते २६ वयोगटातील पदाधिकारी असतील. यासाठी किमान पदवीची अट घालण्यात आली आहे. 

सासुरवाडीत घाम 
राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षकार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, अचानक हॉल खचाखच भरला. यामुळे अधिक उष्णता निर्माण झाली. हॉलमधील सर्व घामाघूम झाले. तेव्हा खास विनोदी शैलीत पवार यांनी यावरही भाष्य केले. ते म्हणाले, सासुरवाडीत बोलावून घाम काढता काय राव, शेतात काम करूनही इतका घाम येत नाही, असे म्हणताच हास्याचे फवारे उडाले. 

घोषणांची नावे चांगली 
केंद्र राज्याच्या घोषणांची नावेच चांगली आहेत. स्मार्टसीटी, मेक इन इंडिया, अशी ऐकायला चांगली वाटणारी नावे ठेवण्यात आली आहेत. मात्र, याचा जनतेला काहीच उपयोग नाही. तीन वर्षात जिल्ह्यात एकही उद्योग आला नाही. सौर प्रकल्पासाठी चार वेळा निविदा काढण्यात आल्या आहेत. अजूनही काहीच उपयोग झालेला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत काहीच किंमत नसल्याची टीका पवार यांनी केली. 

पुरावे दिले तरी गप्प 
पवार म्हणाले, खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर घालवले. दुसऱ्या मंत्र्यांबाबत पुरावे सादर केले. सभागृहात साबण, चिक्की आणून दाखवली. परंतु, त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. चुकीचे आरोप असल्याचे सांगत त्यांना वाचवले. मात्र, ज्यांना घालवायचे होते, त्यांना सहज घालवले. 

जिभ आवरली : पवारयांनी जोरदार टीका केली. विजय मल्ल्या ९०० कोटी घेऊन पळून गेला. त्याचे शासनाने काहीच.., इतकेच बोलून ते थोडे थांबले आणि एखादा शब्द तोंडातून बाहेर पडल्यास गोंधळ होतो, असे सांगत आवरते घेतले. 

 
बातम्या आणखी आहेत...