आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिधापत्रिका निवासी पुरावा नाही, निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिधापत्रिकेचा वापर शिधावस्तूंसाठी केला जातो. विविध दाखले मिळविण्यासाठी अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयांत निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिकेची मागणी केली जाते. मात्र, शिधापत्रिका निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरू नये, असे आवाहन अन्न नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली.
दूरध्वनी जोडणी, घरगुती गॅस जोडणी, बँकेत खाते उघडणे, पॅन कार्ड काढणे, पारपत्र मिळविणे, वाहन चालविण्याचा परवाना मिळविणे, रुग्णालयात दाखल करणे, शाळा, महाविद्यालयांत प्रवेश अशा अनेक कारणांसाठी अर्जदारांकडून शिधापत्रिकेची मागणी केली जाते. पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका देताना केवळ अर्जदाराने दिलेल्या पत्त्यावर राहतो किंवा कसे, एवढीच जुजबी चौकशी केली जाते.

शासनाने जून २०१० रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात शिधापत्रिकांचा वापर निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरू नये, अशा सूचना दिल्या आहेत. तसा उल्लेख शिधापत्रिकेवरही केलेला आहे. मात्र, अजूनही बऱ्याच कार्यालयात निवासाच्या पुराव्यासाठी शिधापत्रिकांची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने अन्न, नागरी, पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने शिधापत्रिकांचा निवासी पुरावा म्हणून वापर करू नये, असे पत्रकामध्ये नमूद केले आहे.

पत्ता प्रत्यक्षात नसला तरी शिक्षाप़त्रिकेचा वापर शक्य
अर्जदाराचे राहण्याचे ठिकाण कायदेशीर आहे किंवा कसे, तसेच तो पक्क्या घरात राहतो की झोपडपट्टीत, या बाबी पाहिल्या जात नाहीत. संबंधित व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंब दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष राहत नसले तरी शिधापत्रिकेचा नियमित वापर होणे शक्य आहे. शिधावस्तू नेण्यासाठी स्वत: कुटुंबप्रमुखानेच आले पाहिजे, असे बंधन नाही. अशा परिस्थितीत शिधापत्रिकेचा वापर हा निवासाचा पुरावा होऊ शकत नाही.