आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायदानात गती येण्यास पुरेसे न्यायाधीश नेमावेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - न्यायदान प्रक्रिया गतिमान होण्यासाठी आवश्यक प्रमाणात न्यायाधीशांची नियुक्ती न्यायालयांची निर्मिती झाली पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमानी यांनी व्यक्त केले. रविवारी अकलूज (ता. माळशिरस) येथे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या विभागीय वकील परिषदेचे त्यांच्या हस्ते उद््घाटन झाले. या वेळी त्या बोलत होत्या.
न्यायमूर्ती ताहिलरमानी म्हणाल्या, आरोपीला शिक्षा मिळेपर्यंत जे घटक काम करतात त्यांनी प्रामाणिक राहण्याची गरज आहे. सरकारी वकिलांनी लक्ष घालून जास्तीत जास्त आरोपींना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दहा दोषी सुटले तरी बेहत्तर परंतु एकही निर्दोष दोषी ठरता कामा नये, यासाठीही दक्ष राहिले पाहिजे.”

न्यायमूर्ती के. के. थातेड म्हणाले, वकिलांनी जास्तीत जास्त प्रकरणे न्यायालयाच्या बाहेरच तडजोडीने मिटवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. जीवनात तडजोडीला खूप महत्त्व आहे. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर वेळेनुसार दाखवण्यात येणारी समजदारी असते.”

साॅलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग म्हणाले, समजातील सर्व घटकांत शेतकऱ्यांची नेहमी हेळसांड होते. वकील बांधवांनी शेतकऱ्यांविषयी नेहमी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे.” बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. हर्षद निंबाळकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. याप्रसंगी न्यायमूर्ती ए. एम. ठिपसे, न्यायमूर्ती आर.डी. धनुका, न्यायमूर्ती साधना जाधव, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, जिल्हा सत्र न्यायाधीश दुंडप्पा हातरोटे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते, आमदार हनुमंत डोळस, अॅड.मिलिंद थोबडे, माळशिरसचे अध्यक्ष अॅड.विलास मगर यांच्यासह सोलापूर, पुणे, सांगली, सातारा कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील न्यायाधीश वकील उपस्थित होते.
अकलूजचे कौतुक
या परिषदेत अनेक विधिज्ञांनी अकलूजच्या विकासाचे कौतुक केले. येथील विकासाचे श्रेय येथील नेतृत्वाला जाते, असे साॅलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग म्हणाले. स्मार्ट सिटीची संकल्पना ज्यांनी काढली ते बहुदा अकलूजला येऊन गेले असावेत, असे विधान अॅड. मिलिंद थोबडे यांनी केले. अकलूजमध्ये जिल्हास्तरावरील सर्व सुविधा उपलब्ध असल्याने ही परिषद येथे ठेवल्याचे अॅड. निंबाळकर यांनी सांगितले.