आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीच्या प्रवासासाठी रेल्वे अन् बसस्थानकावर भाविकांची गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर: श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे आलेल्या लाखो वैष्णवांनी एकादशीचा अनुपम सोहळा डोळे भरून अनुभवला. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंगा ।। या भावनेने सुमारे १० लाखांहून अधिक वारकऱ्यांनी परंपरेने घराण्यात चालत आलेली आषाढी वारी पोहोच केली. येथील बसस्थानकांवर रेल्वे स्थानकावर पहाटेपासून परतीच्या प्रवासासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. खासगी वाहनांनीही भाविक गावी परतत होते.
श्री विठुरायाच्या भेटीला पुढच्या वर्षी पुन्हा येण्याची मनोमन इच्छा व्यक्त करत बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ।। असा गजर करत मोठ्या जड अंत:करणाने भाविक मंगळवारी पंढरीचा निरोप घेत होते. जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता ।। या भावनेने येथील श्री विठ्ठल मंदिराच्या पश्चिमद्वार तसेच महाद्वारात उभे राहून दोन्ही हातांनी स्वत:चे कान पकडून वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणून उड्या मारीत सावळ्या विठुरायाकडे चुकले असेल तर माफ कर अशी क्षमायाचना करत पुढच्या वर्षी पुन्हा तुझ्या भेटीला येण्यासाठी बळ दे, असे साकडे घालत निरोप घेत होते.
वारी पोहोचल्याचा, विठ्ठल दर्शनाचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांचे डोळे ओलावले होते. पहाटेपासूनच त्यांची परतीच्या प्रवासासाठी लगबग होती. दरम्यान, एकादशी दिवशी सोमवारी रात्रभर शहरातील मठ, धर्मशाळा, मंदिर परिसरातील गल्लीबोळांतील वाड्यांमध्ये हरिजागर सुरू होता. पायी आलेल्या भाविकांची श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी लांबच लांब रांग होती. चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची द्वादशी दिवशी मंगळवारी मध्यरात्रीपासूनच स्नानासाठी गर्दी झाली होती. पवित्र स्नान, नगरप्रदक्षिणेनंतर पहाटेपासूनच वारकऱ्यांची द्वादशीच्या न्याहरीची लगबग सुरू होती. महिला वारकरी स्वयंपाकात तर पुरुष मंडळी तुळशीपूजन, हरिपाठात दंग होते. मठांमध्ये भोजनाच्या पंगती सुरू होत्या. त्यानंतर सामानांची बांधाबांध करून वारकरी परतीच्या प्रवासासाठी मुक्कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडत थेट कळस दर्शनासाठी श्री विठ्ठल मंदिर परिसरात येत होते. त्यामुळे मंदिर परिसरातील महाद्वार पश्चिमद्वारात मोठी गर्दी झाल्याचे दिसत होते. पहाटेपासूनच परतीच्या प्रवासासाठी बसस्थानक आणि रेल्वेस्थानकावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. खासगी वाहनांनीही भाविक गावी परतत होते.
भाविकांची आर्थिक लूट
यात्रेसाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. तसेच परिवहन महामंडळाने वेगवेगळ्या भागात स्वतंत्र बसस्थानके उभारली आहेत. रिक्षाचालक वारकऱ्यांना तेथे नेण्यासाठी जादा भाड्याची मागणी करत त्यांची अडवणूक करत होते. भाविक येतानाही त्यांच्याकडून अडवणूक झाली होती.