आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अायटीअाय ते सोरेगावपर्यंत रस्त्यावर तब्बल २०० खड्डे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजापूररोडवर जुलैमध्ये अपघाताच्या मालिकेनंतर गतिरोधक बसवले तेही चुकीच्या पद्धतीने. त्यामुळे पुन्हा एक अपघात मालिकेला तोंड द्यावे लागले. त्याकडे दुर्लक्ष करून नियमात बसणारे गतिरोधक तसेच ठेवण्यात आले. अाता या रस्त्यावर तब्बल २०० खड्डे पडले असून त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत अाहे. केंद्राचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने पाहयला तयार नाही.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांचा दर्जा सुमार असल्याचे वारंवार पहायला मिळू लागले अाहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी जुना पुणे नाका ते रेल्वे स्थानक हा रस्ता दुरूस्त केला, अन् दीडच महिन्यात सप्टेंबरच्या पावसात तो उखडला. पांजरापोळ चौकात मोठे खड्डे पडले. हे वृत्त दिव्य मराठीत प्रसिध्द होताच लागलीच पुन्हा खड्डे बुजवण्यात अाले. रातोरात काम करण्यात अाले. अाता काही दिवस उलटत नाहीत तोवर पुन्हा रस्त्याचा दर्जा सुमार झाला अाहे. तर गेल्या तीन, चार महिन्यापासून विजापूर रस्त्यावर खड्ड्यांची मालिकाच तयार होत अाहे.

अायटीअाय ते सोरेगावपर्यंत रस्त्यावर तब्बल २०० खड्डे
खड्डे वाढतच चालले अाहेत. सध्याच्या स्थितीत अायटीअाय ते सोरेगाव या दरम्यान लहान, मोठे असे जवळपास २०० खड्डे अाहेत. ते बुजविले जात नाहीत. या रस्त्यावर उड्डाण पूल होणार असल्याच्या नावाखाली रस्त्याची नवीन कामे थांबवण्याचा प्रकार होताना दिसतो अाहे.
एकीकडे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसाहती मोठ्या प्रमाणात अाहेत. दुचाकी वाहनांची वर्दळ अाहे. अवजड वाहनांचीही वाहतूक अाहे. त्यामुळे जीवघेण्या अपघातांचे प्रमाण वाढले अाहे. जुलै महिन्यात विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर स्पीड ब्रेकर केले, त्यानंतर चुकीच्या स्पीड ब्रेकरवरून पडून एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. अाता खड्ड्यांमुळे अपघात होऊ लागले अाहेत. या रस्त्यावर पथदिवे असून नसल्यासारखे अाहेत. रात्री खड्डे दिसणार नाहीत असाच या दिव्यांचा उजेड अाहे. अनेक िदवे बंद अाहेत. खड्डे तर दिसतच नाहीत, पण स्पीड ब्रेकरलाही विशिष्ट रंग दिला नसल्याने स्पीड ब्रेकर अाहेत का? तेही दिसत नाहीत.
मोहोळ-कामती-मंद्रूपमार्गे विजयपूर

राज्य महामार्गाची झालीय चाळण
सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यांनी भरला आहे. मोहोळ-कामती-मंद्रूप मार्गे विजयपूर या राज्यमहामार्ग क्रमांक १४९चीही दुरवस्था झाली आहे. तेरामैल ते मंद्रूप या चार किलोमीटर अंतरावर मोठमोठाले खड्डे झालेत. त्यामुळे मालट्रकचे टायर फुटणे, पाटेतुटणे खड्डे चुकवण्याचा प्रयत्नात ट्रक उलटण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकी चालकांचे प्रचंड हाल होत आहे. अनेकांना यामुळे मणक्याचे विकार जडत आहेत. रस्त्यावरील डांबराचे अस्तित्वच संपल्याने उघडी पडलेली खडी ट्रकच्या चाकाखालून उडालेली खडी लागून जखमी होण्याचे प्रकारही घडत आहेत. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी किसान महासभेतर्फे आंदोलन करण्यात आले. पण, त्याकडेही दुर्लक्ष झालेे आहे.

जीव मुठीत घेऊन जावे लागते
^विजापूररस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीवघेणे अपघात होण्याचा धोका वाढला अाहे. छोटे-मोठे अपघात दररोज होतात. रात्रीच्यावेळी तर हे खड्डे दिसत नाहीत. या रस्त्यावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांकडे जाणारे शेकडो वाहनचालक दररोज ये-जा करतात, त्यांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. सिद्धार्थ हाविनाळे, नागरिक, होनमुर्गी

१५ दिवसांत कामाला सुरुवात
^सोलापूर-विजापूररस्त्याचे काम २०१० मध्ये झाले. त्यानंतर या संपूर्ण रस्त्याचे काम आताच होत आहे. सध्या पत्रकार भवन ते जकात नाक्यापर्यंत ७.६ किलोमीटरचे काम होत आहे. याला कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाची टेंडरप्रक्रिया पूर्ण होत आहे. येत्या १० ते १५ दिवसांत वर्क ऑर्डर देऊन काम सुुरू केले जाईल. अशोकभोसले, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग
पीएमअोची दखल, एनएच मनपाची टोलावाटोलवी

विजापूर रस्त्यावर करण्यात अालेल्या रस्त्यावरील गतिरोधक हे चुकीचे असून ते काढून टाकावेत, अशी मागणी येथील प्रा. सुनील कुलकर्णी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमअो) केली होती. त्याची दखल घेऊन याची पाहणी करून अहवाल पाठवावा असे पत्र नॅशनल हायवेला (एनएच) पाठवले अाहे. पण नॅशनल हायवे विभागाने अापल्या अधिकारातील रस्त्यावरील गतिरोधकांची पाहणी करून अहवाल द्यावा असे पत्र महापालिकेला दिले अाहे. या दोन्ही खात्यांकडून टोलवाटोलवी चालू अाहे. हे पत्र १८ अाॅगस्ट रोजी धाडले अाहे, अजूनही काही कारवाई नाही.

बातम्या आणखी आहेत...