आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात रस्ते काम जोमात, महापालिकेकडून अंमलबजावणी नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एकीकडे शासनाने पावसाळ्यात रस्ते करू नये असे स्पष्टपणे अादेश दिलेले अाहेत. हे अादेश नवीन असले तरी यापूर्वीच शासनाने रस्ते बांधणी, दुरुस्तीसाठीचा कालावधी ठरवून दिलेला असताना महापालिका त्याकडे डोळेझाक करते अाहे. सध्या पाऊस चालू असतानाही सम्राट चौक ते बलिदान चौक या दरम्यानच्या रस्त्याचे काम जोमात सुरू अाहे. अशी कामे अनेक ठिकाणी अाहेत. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा कसा राहणार? असा प्रश्न उपस्थित झाला अाहे.
ढगाळ वातावरण, पाऊस येण्याची चिन्हे असल्यास, पाऊस पडताना, धुके पसरल्यानंतर रस्त्यांची कामे करू नये, असे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते बांधणीची मानके सांगणारे सुधारित परिपत्रक काढले. त्यात उष्ण मिश्रित पद्धतीने (हॉट मिक्स हॉट लेड) करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे १० मेपर्यंत पूर्ण करावी. अथवा सुरक्षित स्थितीत आणून थांबवावीत, अशी सूचना अाहे. २० मेपर्यंत डांबरीकरणाची कामे आवश्यक असल्यास अधीक्षक अभियंत्याची परवानगी आवश्यक असल्याचेही त्यात म्हटले आहे.
सोलापूर शहरात हे नियम गुंडाळून रस्त्यांची कामे सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाने सम्राट चौकातील रस्ता भिजून गेला. पाणी साचले. पण त्यावर सध्या मोठ्या जाेमाने रस्त्याचे काम सुरू आहे. तेही हॉट मिक्स पद्धतीने. अशाच पद्धतीचे काम शहरातील इतर भागातही दिसून येते. असे रस्ते टिकणार का? त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कुणाचे?, येत्या पावसाळ्यात हे रस्ते वाहून जाणार नाही याची खात्री काय? असे प्रश्न उभे राहिले आहेत.

१. रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागावर किंवा मातीवर पाणी थांबलेले असल्यास
२. पाऊस पडण्याची स्थिती निर्माण झाल्यास किंवा पाऊस सुरू झाल्यास
३. धुके पसरलेले असल्यास अथवा धुळीची वादळे जोरदार सुरू झाल्यास
४. भूपृष्ठभागाचे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल अशा वेळी
५. ताशी ४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वारे वाहत असतील तर त्यावेळी
सम्राट चौक पोलिस चौकीसमोर सुरू असलेल्या रस्त्याचे काम पाहा. गुरुवारी पावसाचे पाणी रस्त्यावर असताना, त्यावर खडी अंथरली गेली. हॉट मिक्स पद्धतीने डांबरीकरणही केले गेले.
अशा स्थितीत रस्ते काम नाही

कुणी केले नियम
भारतीय रस्ते महासभा (इंडियन रोड काँग्रेस) आणि भूपृष्ठ परिवहन मंत्रालय (मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्ट) यांनी तयार केलेल्या अद्ययावत मानकांचा वापर करणे बंधनकारक आहेत. त्याबाबत अधिकारी दक्ष राहावे, अशा सूचना आहेत. यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे मे रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

सर्वांना सूचना देतो
^रस्तेबांधणीच्या मानकांचे पालन आवश्यकच आहे. त्याचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कारवाई होईल. त्याबाबतची सूचना सर्व विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात येईल. झालेल्या रस्त्यांची पाहणीही करू.” लक्ष्मण चलवादी, नगरअभियंता, मनपा
बातम्या आणखी आहेत...