आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

११ महिन्यांनंतर मिळाला ५९ रस्त्यांचा चौकशी अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुख्यमंत्री विशेष निधीतून जुळे सोलापूर भागात केलेल्या रस्ते चौकशीचा अहवाल ११ महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला असला तरी अहवालामध्ये नेमक काय दडले आहे ? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. अहवाल प्राप्त झाला असून अहवालाची समरी तयार करण्याचे काम सुरू असून सोमवारी समरी मिळेल, त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

नगरसेवक नरेंद्र काळे यांच्या तक्रारीवरून तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी जुळे सोलापूर परिसरात मुख्यमंत्री निधीतून झालेल्या ५९ रस्ते चौकशीसाठी सहा पथके आणि वालचंद महाविद्यालयाची नियुक्ती केली होती. मात्र या ५९ रस्त्यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्यास ११ महिन्यांचा कालावधी लागला. याबाबत संबंधित महापालिकेने चौकशी करणाऱ्या एजन्सीची फी दिली नसल्याने काही दिवस हा अहवाल लटकला होता, पुन्हा फी दिल्यानंतर अहवालाचे काम करून हा अहवाल अखेर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपवण्यात आला.

तहसीलदारांनी मागितली सुरक्षा
फ्रुटीबारवरील कारवाईनंतर रजेवर गेलेले अक्कलकोटचे तहसीलदार गुरू बिराजदार हे सोमवारी रुजू झाले. मात्र, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे माझ्या जिवितास धोका असून मला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेची गरज आहे का? याची चौकशी करण्याच्या सूचना पोलिस यंत्रणेस केल्या आहेत. पोलिसांचा अहवाल मिळताच त्यांना सुरक्षा पुरवणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले.