आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी गुंडाळले अवघ्या दहा मिनिटांतच रास्ता रोको आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘जिल्हाधिकारी मुर्दाबाद, पोलिस आयुक्त झिंदाबाद’, ‘चले जाव, कलेक्टर चले जाव’च्या घोषणा देत शहरात रास्ता रोखण्याचा प्रयत्न झाला. अवघ्या दहा मिनिटांतच आंदोलन गुंडाळत पोलिसांनी नेत्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली. शहरात सात ठिकाणांहून आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांची नंतर लगेच सुटकाही झाली.

सिद्धेश्वर यात्रेतील सुविधांच्या मुद्द्यांवरून देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्या वाद सुरू आहे. यात्रा काळात भाविकांना धुळीपासून त्रास होऊ नये यासाठी होम मैदानावर मॅट टाकणे आणि संकटकाळासाठी पर्यायी रस्ता मोकळा सोडणे आदी गोष्टींवर जिल्हा प्रशासन आग्रही आहे. मात्र, समितीचा यास विरोध आहे. तो नोंदवण्यासाठी आधी शहर बंद आंदोलन करण्यात आले. रविवारी रास्ता रोको करण्यात आला. शहरात तीन राष्ट्रीय महामार्ग आणि चार राज्य महामार्गांवर आंदोलन झाले. यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी अग्रभागी होते. त्यात समितीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते, भाविक सहभागी झाले होते. दुपारी १२ वाजता आंदोलनास सुरुवात झाली. प्रमुख नेते असलेल्या पाचही ठिकाणी आंदोलन दहा मिनिटांत संपले. केवळ तुळजापूर रस्ता, सैफूल आणि मल्लिकार्जुन नगर येथे काही वेळ लागला.

पुणे महामार्गावरील उड्डाण पुलानजिक श्री. काडादी, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, जगदीश पाटील, मनोहर सपाटे, राजशेखर शिवदारे, शिवसेनेचे लक्ष्मीकांत ठाेंगे-पाटील, राजाभाऊ आलुरे यांना अटक झाली. फौजदार चावडी पोलिस ठाण्यात त्यांना आणण्यात आले. पोलिसांच्या गाड्यांत जागा नसल्याने आंदलोनकर्त्यांनी स्वत:च्या गाड्यांनी चौकीत येऊन अटक करवून घेतली.

हैदराबाद महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारावर पालकमंत्री देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक शिवानंद पाटील, प्रा. अशोक निंबर्गी आदी होते. अक्कलकोट रस्त्यावर शांती चौकामध्ये माकपचे सिद्धाप्पा कलशेट्टी, माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, माजी नगरसेवक सुरेश तमशेट्टी यांनी बराचवेळ रस्ता बंद ठेवला. मल्लिकार्जुन नगर येथे तमशेट्टी यांनी रस्त्यावर ठिय्याच मारला. सुमारे पाऊण तास येथे वाहतूक खोळंबली.

विजापूर रस्त्यावर सैफूल येथे महामार्गावर अॅड. राजशेखर बिराजदार, नगरसेवक नरेंद्र काळे, गवळी समाजाचे भारत परळकर आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. तुळजापूर रस्त्यावर सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सिद्धाराम चाकोते, शिवा संघटनेचे राजू हौशेट्टी, जयराज नागणसुरे यांनी वाहतूक थांबवली. यावेळी आनंद तालीकोटी, वैभव विभूते, रविकांत हौशेट्टी, अरुण लातुरे, संजय कणके, विशाल कांबळे यांची उपस्थिती होती. होटगी रस्त्यावरील सिद्धेश्वर कारखान्यासमोरील टोल नाक्यावर माजी आमदार महादेव पाटील, लिंबराज पाटील आदींनी आंदोलन केले.

जिल्हाधिकाऱ्यांची बदली व्हावी, त्यांनी मॅट आपात्कालीन मार्गाचा हट्ट सोडावा, आणि या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भावना व्यक्त करण्यात आली. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून लकवरच चांगला निर्णय होईल, अशी माहिती ठोंगे-पाटील दिली.

आपल्याच सरकार विरोधात पालकमंत्री
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी देवस्थान समिती इतर संघटना आंदोलन करत आहेत. त्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुखही सामील झाले आहेत. त्यांनी समितीची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली. मात्र, परिणाम झाला नाही. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या सरकारविरुद्ध पालकमंत्री रस्त्यावर येऊन रास्ता रोको करावे लागल्याचे चित्र आहे.

बदलीची मागणी राज्य सरकारकडे पोहोचणार
^जिल्हाधिकारी यांच्या आठमुठे धोरणामुळे रस्त्यावर उतरावे लागले. सिद्धेश्वर भक्त, सर्वपक्षीय नेते आणि सर्व जातीधर्माच्या लोकांनी मिळून हा रास्ता रोको केला आहे. आमची सत्त्व परीक्षा पाहणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी पालकमंत्री देशमुख यांच्यासमवेत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.” धर्मराज काडादी, अध्यक्ष,सिद्धेश्वर देवस्थान समिती, सोलापूर
शंाती चौक येथे माकपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...