आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओची चाके उलट्या दिशेने, कागदावर आरसी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यातील सर्व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे (आरटीओ) डिजिटलायझेशन करण्याचा विचार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला. मात्र वस्तुस्थिती पाहता आरटीओची चाके उलट्या दिशेने फिरताना दिसत आहेत.
आरसी स्मार्ट कार्डच्या निविदा दोन वर्षांपासून निघत नसल्याने वाहनधारकांना पेपर आरसी देण्यात येत आहे. त्याचाही तुटवडा असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. थोडक्यात, आरटीओचा प्रवास स्मार्ट कार्ड ते पेपर अारसी असा उलटा दिशेने होत आहे. कागदाच्या आरसीचा प्रवास थांबणार कधी हा सवाल सर्वसामान्य वाहनधारकांकडून विचारला जात आहे.
सोलापूर आरटीओ कार्यालयात गेल्या दीड ते दोन महिन्यापासून पेपर अारसी नाही म्हणून जवळपास ३० ते ४० हजार वाहनधारकांना फटका बसला आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर नुकतेच पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून सुमारे १५ हजार पेपर आरसी मिळाले.

आरसीसाठी वापरला जाणाऱ्या कागदाचा दर्जा हा अत्यंत साधा आहे. त्यामुळे त्याचे आयुर्मान अत्यंत कमी आहे. तसेच, या कागदावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतो. अनेक वेळा वाहनधारकांना वाहतूक पोलिस आरसीची विचारणा करतात तेव्हा हे कागद म्हणजेच आरसी आहे हे पटवून सांगण्यात दमछाक होते. केवळ निविदा नाही म्हणून सोलापूरसह राज्यातील सर्व वाहनधारकांंच्या नशिबी आरसीसारखे महत्त्वाचे कागदपत्र साध्या कागदावर स्वीकारण्याची पाळी आली आहे.

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून परिवहन विभागाने याकडे दुर्लक्ष केले. वाहनधारकांना पेपर आरसीसाठीही दोन ते तीन महिने वाट पाहावी लागते. एक तर स्मार्ट कार्ड नाही. त्यातून साधा कागदही पुरवण्यास परिवहन विभाग अपयशी ठरत आहे. कागद नाही ही सबब सांगून सर्व वाहनधारकांना वेठीस ठेवण्याचा प्रकार आरटीओ कार्यालयाकडून घडत आहे.

लायसन्स (वाहन परवाना) देण्यासाठी स्मार्ट कार्डचा वापर केला जातो. हैदराबाद येथील यूटीएल नावाच्या कंपनीस याचा मक्ता देण्यात आला आहे. लायसन्ससाठी स्मार्ट कार्ड उपलब्ध होतात तर आरसी साठी का होत नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यूटीएल कंपनीस जर तात्पुरते स्वरूपात जरी आरसीचे काम देण्यात आले तरी वाहनधारकांची सोय होऊ शकते. मात्र परिवहन विभागाने आरसी स्मार्ट कार्डचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

प्रधान सचिव यांच्या सहीनंतर निविदा
^आरसी स्मार्टकार्ड निविदा काढण्यासंबंधीची फाईल माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्रधान सचिव यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. प्रधान सचिव यांची सही झाल्यानंतर निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. डाॅ.प्रवीण गेडाम, परिवहन आयुक्त, मुंबई

गैरसोय होऊ नये म्हणून पेपर आरसी
^सोलापूर आरटीओस पुणे कार्यालयाकडून पेपर आरसीचा पुरवठा होतो. त्यांच्याकडील साठा संपल्याने सोलापूरकरिता पुरवठा थांबविण्यात आला होता. वारंवार पत्रव्यवहार करून नुकतेच १५ हजार पेपर आरसी साठी प्राप्त झाले आहे. आरसी स्मार्ट कार्डसाठी निविदा निघणे गरजेचे आहे. ती निघत नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून पेपर आरसी देत आहे.
बजरंगखरमाटे, आरटीओ अधिकारी

राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये २००७ पासून आरसी वाहन परवाना स्मार्ट कार्ड स्वरूपात देण्याचे काम सुरू झाले. आरसी स्मार्ट कार्डसाठी प्रशासनाने ३९४ रुपयांचा तर लायसन्स स्मार्ट कार्ड साठी २६४ रुपयांचा दर आकारला होता. आरटीओ कार्यालयांना आरसी स्मार्ट कार्ड देण्याचा मक्ता दिल्ली येथील शाँक टेक्नोलॉजी प्रायव्हेट लि.ने घेतला होता. एक कोटी अारसी स्मार्ट कार्ड देणे अथवा १५ वर्षांपर्यत स्मार्ट कार्ड पुरवण्याचा करार झाला होता. त्यानुसार एक करोड कार्ड दिल्यानंतर २०१४ मध्ये हा करार संपुष्टात आला. हा करार संपल्यानंतर परिवहन विभागात केवळ निविदांचा गुऱ्हाळ चालत आहे. दोन ते अडीच वर्षात कुणालाच मक्ता मिळाल्याने वाहनधारकांना कागदावरच समाधान मानावे लागत आहे.
बातम्या आणखी आहेत...