सोलापूर - लाकडातील भेगा आणि खड्डे भरण्यास उपयुक्त असे फिलरचे संशोधन सोलापूरच्या ऋषिकेश बदामीकर या तरुण व्यावसायिकांनी केले आहे. या संशोधनाला केंद्र सरकारने पेटंट दिले आहे. संशोधनासाठी बदामीकर यांना प्रा. डॉ. श्रीकांत लोळीकर आणि प्रा. सुहास शेडजाळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
हे पेटंट म्हणजे सोलापूरच्या संशोधकाचा बहुमान आहे. बदामीकर हे फर्निचरचे व्यावसायिक आहेत. अनेक प्रकारच्या लाकडाची हाताळणी त्यांनी केली.लाकडावर नैसर्गिक छिद्रे असतात. काही ठिकाणी खड्डे, भेगाही पडलेल्या असतात. अशा वेळी कारागीर त्यावर उपाय करतात, परंतु ते दीर्घकाळ टिकणारे नसतात. अशा लाकडापासून बनवलेली उत्पादने ग्राहकांकडून पुन्हा परत येऊ शकतात. अशा बाबींवर सातत्याने संशोधन करून श्री. बदामीकर यांनी एक पदार्थ बनवला. त्यातील रासायनिक घटकांसाठी तज्ज्ञ प्राध्यापक मंडळींची मदत घेतली. त्यापासून उत्पादने बनवून त्याचा टिकाऊपणा पाहिला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी संशोधनपर प्रबंध केंद्राच्या पेटंट कार्यालयाकडे पाठवला. त्याची पडताळणी झाल्यानंतर पेटंटचे प्रमाणपत्र श्री. बदामीकर यांना प्रदान करण्यात आले.
संशोधनातून पेटंट मिळवणारे सोलापूरकर अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत. पेटंट मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामागे प्रचंड मेहनत असते. पर्यावरण, प्रदूषण आदी बाबींचा विचार करून उत्पादने बनवावी लागतात. घातक रासायनिक पदार्थांचा वापरही करता विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करावे लागते. अशा संशोधनालाच पेटंट मिळत असते.
बाहेरील देशांमध्ये निर्यातही सुरू केली
प्लायवूड उत्पादकांसाठी हे फिलर आहे. ते चिरकाल टिकणारे असून, त्यापासून तयार झालेले फर्निचर अतिशय टिकाऊ असेल. त्यावर कुठल्याही ऋतुमानाचा परिणाम होणार नाही. देशाबाहेरील उत्पादकांनीही त्याचे प्रयोग करून पाहिले. त्याची मागणी नोंदवली. आता निर्यातही सुरू झाली. ऋषिकेश बदामीकर, संशोधक