आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतांचे पालखी सोहळे वेशीवर विसावले, संतभार आज पंढरीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी एकादशीचा अनुपम्य सोहळा केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बुधवारी (दि.१३) सुमारे तीन लाखांहून अधिक वारकरी सायंकाळपर्यंत येथे दाखल झाले होते. राज्याच्या विविध भागांतून येणारे पालखी सोहळे पंढरीनगरीच्या उंबरठ्यावर असलेल्या वाखरी येथे विसावले आहेत.

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद््गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळे वाखरी येथे मुक्कामासाठी दाखल झाले आहेत. त्यापूर्वी बाजीराव विहीर येथे रिंगणसोहळे पार पडले. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग बुधवारी (दि.१३) दुपारी सर्व पत्राशेड भरून रिध्दीसिध्दी गणपतीच्या पुढे गोपाळपूर रोडवर गेली होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळे आषाढ शुद्ध दशमी म्हणजेच गुरुवारी (दि.१४) सायंकाळी पंढरीत दाखल होणार आहेत.

उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी दुपारी ३.२० वाजता मुंबई येथून विमानाने सोलापूर विमानतळावर त्यांचे आगमन होईल. ३.२५ वाजता विमानतळावरुन हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे प्रयाण करतील. शुक्रवारी पहाटे २.२० वाजता विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेस ते उपस्थित राहतील. शुक्रवारी सकाळी १० वा. सोलापुरात पोहोचून मुंबईकडे रवाना होतील.

विठ्ठल दर्शनासाठी लागतोय १० तासांहून अधिक काळ
श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी सुरू असलेली दर्शनरांग गोपाळपूर रसत्यावर उभारण्यात आलेल्या पत्राशेडच्या बाहेर आली होती. पदस्पर्श दर्शनासाठी १० तासाहून अधिक कालावधी लागत आहे. दर्शनरांगेत घुसखोरी करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्नशील आहे.
बातम्या आणखी आहेत...