आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्ल्यू व्हेल गेमच्या विळख्यात समीर अडकला; प्रसंगावधान राखत वाहतूक पोलिसाने केली सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सध्या ‘ब्ल्यू व्हेल’ या जीवघेण्या गेमच्या दुष्टचक्रात अडकणाऱ्या मुलांबद्दल जगभर चिंता व्यक्त होत आहे. याच गेमच्या नादात सोलापूरमधील नववीतील विद्यार्थी समीर घराबाहेर पडला. मात्र, गुरुवारी त्याचा तातडीने शोध घेऊन पोलिस कर्मचारी अमोल यादव यांनी त्याचा जीव वाचवला. या गेमचे टास्क पूर्ण करण्यासाठी समीर आत्महत्येच्या विचारात होता, असेही स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, समीर याच्या सोलापूरमधील शाळेतील आणखी सहा-सात विद्यार्थी ब्ल्यू व्हेलच्या विळख्यात सापडले असल्याची माहिती समोर येत आहे.  या गेमच्या नादात घराबाहेर पडलेल्या समीरचा शोध  घेणारे ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिस अमोल यादव यांनी यासंदर्भात गुरुवारची घटना कशी घडली, समीर माग कसा काढला, याबाबत सविस्तरपणे सांगितले.

समीरच्या सॅकमध्ये पोलिसांना चाकू, करकटक, दाेरी इत्यादी साहित्य मिळाले. यावरून समीरचा आत्महत्येचा विचार होता असा अंदाज अमोल यादव व समीरच्या पालकांनी बांधला. ब्ल्यू व्हेलच्या नादामुळे समीरला होत असलेल्या मानसिक त्रासाचा बुधवारचा सहावा दिवस होता. खेळाच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये  घरातून बाहेर पडताना त्याने चिठ्ठी लिहिली होती. ज्याच्याकडून त्रास होत आहे, अशांचीही नावे चिठ्ठीमध्ये लिहिण्याची सूचना खेळाच्या अॅडमिनने दिलेली असते. त्यानुसार समीरने चिठ्ठीत एका वर्गमित्राचे नाव लिहिले हेाते. शाळा बदलण्याचा आई-वडिलांचा निर्णयही त्याला मान्य नव्हता. चिठ्ठीत आई-वडिलांचा उल्लेख करीत त्याबद्दल नाराजी लिहिली होती. चिठ्ठी वाचल्यानंतर पोलिस शिपाई अमोल व वडील रमेश यांनी त्याच्या वर्गमित्राकडे धाव घेतली. समीरकडील मोबाइलच्या आधारे माग काढत टेंभुर्णीपर्यंतचे धागेदाेरे मिळाले. यानंतर त्या दिशेने गेलेल्या एसटीचे चालक-वाहकांशी संपर्क साधून सोलापूर-पुणे एसटीत असलेल्या समीरचा शोध घेण्यात यश आले. शेवटी भिगवण येथे ही बस थांबवण्यात आली आणि ब्लू व्हेलच्या दुष्टचक्रातून समीरची सुटका करण्यात आली. 

पोलिस अधीक्षकांनी केला अमोल यादव यांचा सत्कार
समीरच्या शोधात झटपट महत्त्वाची कामगिरी बजावणारे पोलिस कर्मचारी अमोल यादव यांचा सत्कार चव्हाण कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांच्याच कार्यालयात केला. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्याची सूचना प्रभू यांनी केली. ब्ल्यू व्हेल गेमपर्यंत जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे पोलिस अधीक्षकांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
बातम्या आणखी आहेत...