आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीरच्या ‘ब्रेन मॅपिंग’चा आज न्यायालयात निर्णय, वाढीव कोठडीची मागणी अमान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड याला चौथ्यांदा पोलिस कोठडी द्यावी, ही पोलिसांची मागणी फेटाळत न्यायालयाने त्याची ९ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश सोमवारी दिले. दरम्यान, समीरची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज पोलिसांनी न्यायालयात दाखल केला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
समीरला १६ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तेव्हापासून त्याला १३ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात उभे केले. यानंतर सरकारी वकील अॅड. सी. आर. बुधले यांनी युक्तिवाद सुरू केला.

‘काही मोबाइल हँडसेट आणि सिमकार्डची तपासणी अद्याप बाकी आहे. तसेच सुरुवातीला पनवेल येथून हँडसेट दुरुस्तीसाठी आणले म्हणणारा समीर आता हे हँडसेट गोव्यातील फोंडा येथील रामनाथी आश्रमातून आणल्याचे सांगून तपास यंत्रणांची दिशाभूल करत आहे. त्यांच्या मानसिक चाचणीचा अहवाल गुजरातहून अजून येणे बाकी आहे. फोंडा येथील आश्रमातील श्रद्धा पवार यांचा सनातन साधक विनय पवार यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, विनय हेदेखील काही वर्षांपासून बेपत्ता आहेत. या सर्व बाबींचा तपास होण्यासाठी समीरची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे बुधले यांनी न्यायालयास सांगितले.

समीरच्या बाजूने अॅड. समीर पटवर्धन यांनी आक्रमक पद्धतीने प्रतिवाद केला. ‘पोलिस केवळ वेळ काढण्याचे नाटक करत आहेत. पोलिस कोठडीतील बारा दिवसांत पोलिसांनी कोणताही ठोस पुरावा मिळवलेला नाही. गुन्हा कसा घडला, कशासाठी केला, त्यासाठी कोणते हत्यार वापरले या मूलभूत बाबींचा तपास बाजूलाच पडला असून पोलिस केवळ मोबाइल हँडसेट आणि सिमकार्डमध्येच अडकले आहेत. तसेच वेळ काढण्यासाठी रुद्र पाटीलच्या नावाचा वापर केला जात अाहे,’ असा आरोपही या वेळी करण्यात आला. अॅड. एम. एम. सुहासे यांनीही समीरची बाजू मांडली. यानंतर अर्ध्या तासानंतर न्यायाधीशांनी पोलिसांची पोलिस कोठडीची मागणी नाकारत समीर गायकवाड याला न्यायालयीन पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

जादा बंदोबस्ताचे आदेश
न्यायालयीन कोठडीचा आदेश झाल्यानंतर लगेचच आपल्या अशिलाला संरक्षण देण्याची मागणी समीरच्या वकिलांनी केली. ही मागणी मंजूर करतानाच जादा पोलिस बंदोबस्त देण्याबाबत न्यायालयाने पोलिसांना आदेश दिल्याची माहिती समीरचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी दिली.
घाटगेंना विरोध
कोल्हापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांनी उमा पानसरे यांच्या भूमिकेतून बोलणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याला समीरच्या वकिलांनी विरोध केला. ‘तुम्हाला सरकारी वकिलांच्या सहकार्यासाठी बाजू मांडता येईल, मात्र तसे लेखी द्या,’ असे न्यायाधीशांनी त्यांना सांगितले, मात्र घाटगे यांनी त्यास नकार दिला.