सोलापूर - शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संगमेश्वर महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी पालकांची पहिली पसंती असते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रवेशासाठी रांगा लागतात. यंदाही तशीच परिस्थिती आहे. मात्र, महाविद्यालयाने तात्पुरते पत्रा शेड उभारून प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज भरताना विद्यार्थी पालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
महाविद्यालयाच्या मैदानातच छोट्या शेडमध्ये अर्ज तपासणी स्वीकृती सुरू केली आहे. या ठिकाणी अजिबात नियोजन दिसून येत नाही. कोणाकडे अर्ज तपासणी करायची? कोठे अर्ज भरायचा काहीच कळत नसल्याने पालक संभ्रमात होते. तर दुसरीकडे पत्रा शेडमध्ये प्रचंड गर्दी झाल्याने असह्य उकाडा सहन करावा लागत होता. फॉर्म लिहिण्यासाठीही सोय नव्हती. अनेकांनी धुळीत बसून, गाडीच्या सीटवर, कारच्या बोनेटवरकिंवा उभ्या उभ्या फॉर्म भरण्यास सुरवात केली. फोटो कसे चिटकवणार? स्टेलपर आहे? पेन आहे काय? टाचणी तरी आहे काय? अशी विचारणा करीत पालक हैराण झाले. काहीच सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यात पिण्यासाठी पाण्याची, फॉर्म लिहिण्यासाठी किमान डेस्कची सोय तरी हवी होती.
कॉलेजने सोय करावी
संगमेश्वर महाविद्यालयाने विद्यार्थी पालकांना उन्हात उभे करून प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. किमान सोयी उपलब्ध करणे आवश्यक होते. - लहू गायकवाड, जिल्हाध्यक्ष, भारतीय विद्यार्थी सेना
उन्हातच उभारावे लागले
^संगमेश्वर महाविद्यालयाने चक्क धुळीच्या मैदानावर एका तात्पुरत्या पत्राशेडमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केली. उन्हात उभारणे, त्यात फॉर्म भरणे यामुळे अतिशय हैराण झालो. पिण्याचे पाणी नाहीच, अर्ज भरण्यासाठी साधे डेस्कही नाहीत. उमेश उकरंडे, पालक
तात्पुरती सोय आहे
^प्रवेशप्रक्रियेवळीकॉलेजमध्ये खूप गर्दी होते. म्हणून यंदा मैदानावर ही सोय केली आहे. प्रचंड गर्दीमुळे कॅम्पसमधील विद्यार्थी - विद्यार्थिनींना, पालकांनाही त्रास होत होता. दोन तीन दिवसासाठी ही सोय आहे. पुढीलवर्षी नियोजनबद्धरीत्या चांगल्या सोयी उपलब्ध होतील. डॉ. डी. डी. पुजारी, प्राचार्य,संगमेश्वर