आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; जीवनशैलीचे दुष्परिणाम !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजीव पिंपरकर - Divya Marathi
संजीव पिंपरकर

पाश्चिमात्य संस्कृतीला अांधळेपणाने जवळ करणाऱ्या  धावत्या  जीवनशैलीचे किती दुष्परिणाम होत आहेत, हे नुकत्याच झालेल्या देशव्यापी पाहणीतून स्पष्ट झाले आहे. बदलती आणि तणावपूर्ण जीवनशैली यामुळे निर्माण होणारे रोग हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. १९९० ते २०१६ दरम्यानच्या २५-२६ वर्षांतील आरोग्य समस्यांच्या, मृत्यूमागच्या कारणांचा अभ्यास  शासकीय पातळीवर केला गेला. सर्वच राज्यांतील या संदर्भातील आकडेवारी व निष्कर्ष अभ्यासल्यानंतर एकूणच भारतीय जीवनशैलीचे, आरोग्य सेवेचे, वैद्यकीय समस्यांच्या दृष्टीने लोक कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जात आहेत, हे या पाहणीतून स्पष्ट होते. त्यातूनच ही बाब समोर आली आहे. तणावपूर्ण जीवनशैलीतून निर्माण होणाऱ्या व्याधी, रोग यामुळेच देशभरामध्ये जास्त मृत्यू होतात. विशेष म्हणजे  भारतातील केवळ विकसित राज्यच नव्हे, तर अतिविकसित राज्यांतूनही अशा मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. प्रत्येक राज्यात ओडिशा, राजस्थान आणि आसाम ही तीन राज्ये वगळता अन्य सर्व राज्यांतून हृदयविकारामुळे सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे पाहणीत दिसते. संपूर्ण देशात मृत्यूच्या पहिल्या सहा कारणांचा क्रम हा हृदयविकार, अस्थमा, जुलाब-उलट्या (डायरिया), अर्धांगवायू, श्वसन यंत्रणेशी निगडित रोग व क्षय (टीबी)  असा आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत तोच क्रम हृदयविकार, अस्थमा, अर्धांगवायू, उलट्या-जुलाब, श्वसन यंत्रणेशी निगडित रोग आणि क्षय (टीबी) असा आहे. विशेष म्हणजे गोवा, तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांतून मृत्यूच्या पहिल्या सहा कारणांमध्ये डायरियाचा समावेश नाही, तर ओडिशा आणि झारखंडमध्ये डायरियामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. केरळ हे एकमेव राज्य असे आहे की, जिथे अल्झायमरमुळे होणारे मृत्यू हे सहाव्या क्रमांकावर आहे.

 
सर्वाधिक धक्कादायक म्हणजे तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मृत्यूच्या पहिल्या सहा कारणांमध्ये आत्महत्येचा समावेश आहे. बालके आणि गर्भवती महिलांमधील कुपोषण हे आरोग्याच्या समस्या सुरू होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. १९९० नंतर मुले आणि महिला यांच्या कुपोषणाचे प्रमाण हे कमी झाले आहे. पण अजूनही कुपोषण ही सर्वात मोठी समस्या आहे. जवळपास १५ टक्के आजाराची कारणे ही कुपोषणाच्या समस्येमुळे आहेत. कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेली मुले, महिला यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. लोकशिक्षणाचा मोठा अभाव असतो. अंधश्रद्धा, अज्ञान यामुळे ही समस्या आणखीनच गंभीर होत जाते. व्याधी निर्माण होण्याचे आणखी एक महत्त्वाचे आणि दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे,  ते म्हणजे हवेतील प्रदूषण. हवेतील धुळीचे कण, धूर, धूम्रपान इत्यादी कारणांमुळे हवेतील प्रदूषण ही आरोग्य समस्येच्या दृष्टीने डोकेदुखीची बाब बनली आहे. त्या दृष्टीने दिल्लीचे उदाहरण हे अगदी ताजे आहे.


वाढते शहरीकरण आणि बदलती जीवनशैली यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ‘घाई (हरी), खाण्याच्या सवयी (करी), ताणतणाव (वरी) या तिन्हींसंदर्भातील सवयी आरोग्य समस्या निर्माण होण्याच्या मागची मूळ कारणे बनली आहेत. जीवनशैली बदलल्यामुळे शरीरातील जैविक घड्याळ बिघडते. कामाचे तास वाढल्यामुळे आहार, सवयी आणि शरीराला विश्रांती या तिन्हींवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यातून लोकांना स्थूलपणा, रक्तदाब, मानसिक विकार, मधुमेह अशा अनेक व्याधींना तोंड द्यावे लागते. अशा जीवनशैलीमुळे मानसिक संतुलन बिघडणे, ही एक फार मोठी समस्या बनली आहे. या सगळ्यांच्या मागचे मुख्य कारण म्हणजे आपण भारतीय संस्कृती सोडून पाश्चिमात्य संस्कृतीकडे खूप वेगाने जाऊ लागलो. आपल्या खाण्याच्या, कामाच्या आणि अन्य सवयी त्यामुळे बिघडून गेल्या. मर्यादित कुटुंबामुळेदेखील घरातले वातावरण, नात्यातले परस्पर संबंध बदलत चालले. प्रतिष्ठा महत्त्वाची मानली जाऊ लागली आणि त्यामुळेच माणूस पैशाच्या मागे खूप धावतो आहे. मानसिक संतुलन बिघडल्याने व्यसनाधीनतेकडे वळतो आहे. एकदा शरीरावरचे नियंत्रण सुटले की, माणसाला डॉक्टरकडे धाव घ्यावीच लागते. पण तिकडे जाण्याची वेळ फारशी येऊच नये, अशी जीवनशैली अंगीकारण्याची लोकांची फारसी तयारी नाही. विशेषत: तरुण वर्ग त्याला बळी पडतो. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर भारतीय संस्कृती, भारतीय जीवनशैलीपासून दूर जाणे हे आपल्याला नुकसानकारक आहे. साधी गोष्ट आहे की, तुम्ही तुमचे जेवण योग्य पद्धतीचे व योग्य वेळी केले नाही तर भविष्यात डॉक्टरांनी दिलेली औषधे हेच तुमचे जेवण बनून जाईल, यात तीळमात्र शंका नाही. हे टाळायचे असेल तर प्रत्येकानेच पाश्चिमात्यांच्या दिशेने किती धावायचे याचा विचार केला पाहिजे.


 ‑ संजीव पिंपरकर, निवासी संपादक, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...