आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छंदातून जमा ७८६ क्रमांकाच्या नोटांचा खजिना, ४५ वर्षांपासून छंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सराफ निवृत्ती होनप्पा गायकवाड यांना एक आगळा छंद आहे. तो म्हणजे मालिका क्रमांकात ७८६ आकडे असलेल्या नोटांचा संग्रह करण्याचा! तो गेले ४५ वर्षे अव्याहत सुरू आहे. या छंदाने त्यांच्याकडे वेगवेगळ्या किमतीच्या हजार नोटांचा चांगला संग्रह तयार झाला आहे. ७० वर्षांच्या गायकवाड यांच्या संग्रहात एक ते पाचशे रुपये अशा नोटांचा समावेश आहे. हा छंद जडण्याची एक कथा आहे. ते १९७०च्या सुमारास अजमेर शरीफला गेले होते. तेथे फकीराला दान दिल्यानंतर सुटे परत करताना त्याने दिलेल्या नोटेवर मालिका क्रमांकाच्या शेवटचे आकडे ७८६ होते. मुस्लिम बांधवांत या आकड्याला वेगळे महत्त्व आहे. तेव्हापासून अशा नोटा गोळा करणे सुरू झाले.
हजार नोटांचा संग्रह
दाजी पेठेत राहणाऱ्या गायकवाड यांचा सराफ व्यवसाय आहे. व्यवहारात आलेल्या नोटवर ७८६ क्रमांक आढळला की ते जपून ठेवतात. यातून त्यांच्याकडे १२६४ नग ७८६ क्रमांक असणाऱ्या नोटा आहेत. यामध्ये जुनी एक रुपयाची नोट, लाल रंगाची दोन रुपयाची, हिरव्या रंगाची पाच रुपयाची तर दहा रुपयांच्या विविध प्रकारच्या नोटांचा समावेश आहे. पूर्वीची मोठ्या घडीची पांढरट अशी जुनी नोट संग्रहात आहे. नोटांचे विनीमयमूल्य ३५ हजारांच्या घरात आहे.
काय आहे ७८६चे महत्त्व? : पवित्र कुराणातील ‘बिस्मिल्लाह अर् रहमान निर् रहीम’ हा महत्त्वपूर्ण श्लोक. कोणत्याही कार्याच्या आरंभी त्याचा उच्चार केला जातो. त्याचा साधारण अर्थ ‘परम कृपाळू ईश्वराच्या नावाने सुरुवात करतो’ असा आहे. अरबी भाषेत प्रत्येक अक्षराचे विशिष्ट मूल्य मानले जाते. या अरबी श्लोकात आलेल्या अक्षरांच्या मूल्यांची एकूण बेरीज ७८६ होते. अक्षरी श्लोकाच्या मुद्रणाला पर्याय म्हणून हे आकडे छापण्याची पद्धत मुस्लिम समाजात रूढ आहे. ही पद्धत केव्हा सुरू झाली याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. स्वत: पैगंबर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच त्यांच्यानंतरच्या काळात होऊन गेलेले काही प्रमुख इमाम यांच्यापैकी कोणीही याचा वापर केलेला दिसत नाही. इस्लामच्या आगमनानंतर सुमारे तीनशे किंवा चारशे वर्षांनी ही पद्धत रूढ झाल्याचा अंदाज अभ्यासक सांगतात.
अजमेर यात्रेतील भेट
- अजमेरला १९७० मध्ये गेलो होतो. दर्गा परिसरात त्यावेळी दान दिल्यानंतर फकिराने सुटे परत दिलेल्या नोटेवर ७८६ क्रमांक होता. याला वेगळे धार्मिक महत्त्व आहे. तेव्हापासून या क्रमांकच्या नोटा गोळा करण्याचा छंद लागला.”
निवृत्ती गायकवाड, संग्राहक