आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटांना कर्ज देणाऱ्या फायनान्सवर कारवाई करा, कामगार संघटनांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महिलाबचत गटांना कर्ज देऊन आर्थिक पिळवणूक करणाऱ्या खासगी मायक्रो फायनान्सवर कारवाई करण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. त्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. या वेळी ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम, कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी होते.
शहरात सुमारे ७० हजार महिला विडी कामगार आहेत. तुटपुंज्या वेतनातून त्या घर चालवतात. गरजा भागवण्यासाठी मायक्रो फायनान्सकडून कर्ज घेतात. या खासगी फायनान्स कंपन्यांनी महिलांचे बचत गट तयार केले. त्यांच्या सामूहिक जबाबदारीवर कर्ज दिली जातात. बँकांपेक्षा अधिक व्याजदराने वसूल करतात. ती सक्तीची असते. कामगार मंडळी उपाशी राहून त्याचे हप्ते फेडत असतात. गेल्या महिनाभरापासून विडी कारखाने बंद आहेत. कामगारांच्या हाती पैसा नाही. कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत. अशाही स्थितीत या कंपन्या सक्तीच्या मार्गाने कर्जवसुली करत अाहेत. त्यामुळे तीन महिलांनी आत्महत्या केली. आठ महिला अशा प्रयत्नांतून वाचल्या. या गंभीर स्थितीची दखल घेऊन या फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री फडणवीस मुंबईच्या सह्याद्री विश्रामगृहात भेटले. या वेळी कामगार संघटनांच्या महासंघाचे अॅड. सुनील पवार, सायबण्णा तेग्गेळी, राहुल गुजर, विठ्ठल कुऱ्हाडकर आदी उपस्थित होते.

मायक्रो फायनान्सवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन कामगार संघटनांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम, विष्णू कारमपुरी आदी उपस्थित होते.