आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दप्तराचे ओझे झाले कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब - शाळेतजाणा-या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे, मात्र त्याबाबत ठोस उपाययोजना प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना झेपणारे दप्तराचे ओझे कायम आहे. मात्र, कळंब तालुक्यातील डिकसळ येथील श्रीसंत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर मराठी शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी वर्गातील फरशी फळ्यासारखी काळी केली आहे. यासाठी अवघा १०० रुपये खर्च आला आहे. या उपक्रमामुळेे विद्यार्थ्यांचे हसत-खेळत शिक्षण सुरू आहे.
कोवळ्या जीवाच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासन विविध पर्यायांचा विचार करत आहे. त्यानुसारच जिल्ह्यातील अनेक शाळांनी ही गोष्ट गांभीर्याने घेत वेगवेगळे बदल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असाच काहीसा बदल कळंब तालुक्यातील डिकसळ येथील श्रीसंत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर मराठी शाळेतील इयत्ता पहिलीचे वर्गशिक्षक प्रदीप यादव यांनी केला आहे. बालकांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी एक अभिनव कल्पना सत्यात उतरविली आहे. वर्गात बसण्याच्या जागेजवळील फरशीलाच काळा रंग देऊन लिहण्यासाठी विद्यार्थ्यांना पाटी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दप्तरात पाटी आणण्याची गरज पडत नाही. शाळेतील फरशीवर विद्यार्थी बाराखडी, एबीसीडी आणि गणिताची आकडेमोड करीत आहेत.

वर्गातच पाटीची व्यवस्था केली
मुलांच्यापाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र पाटीची व्यवस्था केली आहे. विद्यार्थी फक्त घरचा अभ्यास लिहून घेण्यापुरत्याच वह्या, पुस्तके दप्तरात आणतात. त्यामुळे त्यांच्या पाठीवरील ओझे कमी झाले आहे.'' प्रदीपयादव, सहशिक्षक, श्रीसंत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर डिकसळ.

शाळेतील वातावरण नेहमी आनंदी आणि तणावमुक्त राहावे, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी ते आग्रही असतात. शाळेचा शिक्षकवर्ग आनंददायी शिक्षणासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते . सदरील शाळा ही ग्रामीण भागातील आहे. ग्रामीण भाग जरी असला तरी येथील लोकाना शिक्षणाचे महत्त्व समजलेले आहे. मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन केले जाते. मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी फरशीचा पाटीसारखा वापर केला जात आहे.


शंभर रुपयांत ४५ पाट्या
इयत्तापहिलीच्या वर्गातील मुलांसाठी फरशीवर बनवण्यात आलेल्या ४५ पाट्यांसाठी शंभर रुपये खर्च आला आहे. त्यामुळे कमी खर्चात याचा फायदा बालकांना होताना दिसत आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पालकांतूनही स्वागत केले जात आहे. कळंब तालुक्यातील डिकसळ येथील बोधले महाराज शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच पाटीची व्यवस्था करण्यात आली आहे.

शाळेकडून विविध उपक्रम
कळंबशहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डिकसळ येथील श्रीसंत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिरात पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. येथील शिक्षक नेहमी आगळेवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे कमी करण्यासाठी आगळावेगळा उपाय शोधून त्याची अंमलबजावणीही केली आहे. शाळेत येणा-या प्रत्येक बालकांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी मुख्याध्यापक पोपट निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मुलांना दप्तराचे ओझे वाटता हसत-खेळत शिकता यावे यासाठी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. या शाळेचा आदर्श इतर शाळांनी घेण्याची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...