आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Reservation Change Into Residential Zone In Jule Solapur

जुळे सोलापुरात शाळेचे आरक्षण बदलून रहिवासी झोनसाठी प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुळे सोलापुरात प्राथमिक शाळेसाठी आरक्षित ठेवलेल्या पाच एकर जागेवरील आरक्षण हटवण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. ही जागा रहिवासी झोनसाठी खुली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मजरेवाडी हद्दीत "सर्व्हे क्रमांक ११३/२/१ ब' येथे पाच एकर १२ गुंठे खासगी जागेवर प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे. हे आरक्षण बदलण्याचा धोरणात्मक निर्णय व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाने हा विषय सभागृहाकडे पाठवला आहे. या परिसरामध्ये महापालिकेची एकही शाळा नाही. असे असताना मनपा शाळेसाठी जागा आरक्षित ठेवण्याऐवजी रहिवासी झोनसाठी मनपा प्रशासन सक्रिय झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, सात रस्ता परिसरात चिल्ड्रन पार्कसाठी आरक्षित असलेल्या जागेवर दवाखान्याचे आरक्षण टाकण्याच्या हालचाली महापालिका नगररचना कार्यालयाने सुरू केल्या आहेत. यासंदर्भात सूचना हरकती मागवल्या आहेत.

महापालिकेने काढले होते पत्र
सदरजागा शाळेसाठी आरक्षित असून त्या जागेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याने मनपाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे महापालिकेने सप्टेंबर २०१४ राेजी प्रेसनोट दिली होती. त्या जागेची खरेदी-विक्री करू नये, असे आवाहन केले होते.

नगरसेविकेच्या पत्रानुसार प्रस्ताव
सदरजागेवरील आरक्षणात बदल करावा, असा प्रस्ताव नगरसेविका राजश्री बिराजदार यांनी दिला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार करून सभागृहाकडे पाठवला आहे. ऑगस्ट महिन्याच्या मनपा सभेच्या अजेंड्यावर विषय आहे.

गरज वाटल्यास शासनाकडे प्रस्ताव
महापालिका सभागृहात नगरसेविका राजश्री बिराजदार यांनी आरक्षण हटवण्यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता. त्यास मंजुरी मिळाली. त्यानुसार प्रशासनाचे मत देऊन पुन्हा सभागृहाकडे पाठवला आहे. त्यानंतर गरज वाटल्यास शासनाकडे तो प्रस्ताव पाठवण्यात येईल.
महेश क्षीरसागर, प्र. सहाय्यकनगर रचना अधिकारी, मनपा

२००४ मध्येही सर्व शाळा होत्या, मग तेव्हा आरक्षण टाकलेच कसे?
वर्ष२००४ मध्ये प्राथमिक शाळेचे आरक्षण टाकण्यात आले. त्यावेळीही केएलई, इंडियन स्कूल, भारती विद्यापीठ, शिवदारे कॉलेज, शांती इंग्लिश मीडियम स्कूल आदी शाळा होत्या. तरीही शासनाने कशाच्या आधारावर आरक्षण टाकले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. आता आरक्षणाची गरज नाही, अशी भूमिका मनपाने घेतली आहे. या धरसोडीमागचे कारण पुढे आलेले नाही.

शाळेसाठी प्रतीक्षा यादी, मनपा म्हणते मुले कमी
सदरजागेच्या परिसरात इंडियन मॉडेल स्कूल, मॉडेल पब्लिक स्कूल, केएलई शाळा, शांती इंग्लिश मीडियम आदी शाळा आहेत. या शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी दरवर्षी प्रतीक्षा यादी असते. तरीही या शाळांना मुले कमी पडतात, असे महापालिकेने प्रस्तावात नमूद केले आहे.

निर्णय शासनच घेणार
राज्यशासनाने जागेवर आरक्षण टाकले होते. पण गेल्या १० वर्षात त्यासाठी वापर झाला नाही. त्यामुळे आरक्षण काढण्यासाठी जागा मालकाने अर्ज केला. त्यावर सूचना हरकती मागवल्या आहेत. पुढील निर्णयही शासनच घेणार आहे, असे महापालिका अधिकारी महेश क्षीरसागर यांनी सांगितले.

मनपाने त्या जागेवर मॉडेल स्कूल उभारावे
त्यापरिसरात सर्वसामान्य मुलांसाठी महापालिकेची एकही शाळा नाही. महापालिकेन त्या जागेवर मॉडेल स्कूल उभे करावे. नरेंद्र काळे, नगरसेवक