आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांना नकोय विद्यार्थ्यांसाठी दिवसांचा आठवडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - आरटीई अॅक्टनुसार शाळांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी प्रत्यक्षात या नियमाची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. विशेष म्हणजे पाच दिवसांचा आठवडा करावा की, नको याबाबत शिक्षण विभागही संभ्रमात आहे. कारण यासंदर्भात पालक किंवा शिक्षक संघटनेने कुठलीही मागणी केलेली नाही. त्यामुळे अंमलबजावणी रखडली आहे. बहुतांश पालकांनी तर सध्या असलेल्या पध्दतीनुसारच शाळेचा कालावधी असावा, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या मतानुसार मुलांवर शैक्षणिक ताण वाढत असल्याने पाच दिवसांचा आठवडा करावा, असा मतप्रवाह पुढे येत होता. मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विधानसभेत तशी मागणी लावून धरल्यानंतर एप्रिलमध्ये(२०१५) महाराष्ट्र शासनाने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. त्याची अंमलबजावणी नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार होती. शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत. गेलेल्या दोन्ही शनिवारी सर्वच शाळांची घंटा खणखणली. त्यामुळे नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांनी शाळेचा रस्ता धरला. म्हणजे पूर्वीच्या पध्दतीनुसारच सहा दिवसांचा आठवडा असून, शाळेत कुठलेही बदल झालेले नाहीत. शिक्षण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार उस्मानाबादसारख्या ग्रामीण भागात अशा नियमांची फारशी गरज नाही. मुलांवर फारसा शैक्षणिक ताण नसल्याने प्रचलित पध्दतीनुसार सहा दिवस शाळा असली तरी विद्यार्थ्यांवर परिणाम होत नाहीत. मेाठ्या शहरांमध्ये शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना उशीर लागतो. शिक्षकांनाही दूरवरचा प्रवास करून शाळेत यावे लागते. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा सोयीचा ठरू शकतो.

सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई) पहिली ते पाचवीपर्यंत वर्षाचे ८०० तास म्हणजे किमान २०० दिवस, सहावी ते आठवी हजार तास म्हणजे २२० दिवस आणि नववी ते दहावीसाठी हजार तास म्हणजे २३० दिवस शिक्षण आवश्यक आहे. पाच दिवसांचा आठवडा केल्यास उरलेल्या पाच दिवसांत विद्यार्थ्यांचे तास पूर्ण करावे लागणार आहेत.

गरजेनुसार पाच दिवसांचा आठवडा करता येईल. मात्र, जिल्ह्यातील शिक्षक किंवा पालक संघटनांनी अद्याप तशी कुठलीही मागणी केलेली नाही. पाच दिवसांचा आठवडा केल्यास तास पूर्ण करण्यासाठी शाळा अधिक वेळ भरवावी लागेल. मागणी आल्यास विचार करू.''
शिवाजीरावजाधव, शिक्षणाधिकारी.

दोन शिफ्टमध्ये शाळा भरत असल्यामुळे मुलांना दुपारनंतर आरामच मिळतो. त्यामुळे ताण येण्याचा प्रश्नच नाही. उलट शनिवारीही अर्धवेळऐवजी दररोजप्रमाणे पूर्णवेळ शाळा भरवावी. रविवार एक दिवस सुटी समाधानकारक आहे. आपल्या भागातील विद्यार्थ्यांवर फारसा ताण नाही.'' सुनीलपवार, पालक.