आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाने अनेक शाळांतून पालकांची लूट, लाखो रुपयांची होते उलाढाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहर व जिल्‍ह्यातील शाळांत विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते. या कार्यक्रमांच्या नावाखाली पालकांची मोठ्या प्रमणावर लूट सुरू आहे. स्नेहसंमेलन सादर करताना लागणाऱ्या कपड्यांसाठी लागणारी किंमत पालकांना भरावी लागते. वरून पालकांना शाळेचा बडगा असतो की, आम्ही सांगतो तिथूनच कार्यक्रमांचे कपडे घ्या. अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचे बंधन पालकांना घातले जाते. त्यामुळेे हे अवघड प्रकरण सांगावे कुणाला? असा प्रश्न आहे. सांगताही येत नाही आणि विरोध करताही येत नाही, अशी अवस्था पालकांची झालेली आहे. त्यामुळे विविध कलागुणांचे दर्शन घडवणारे स्नेहसंमेलन हे शाळेच्या जबरदस्तीचेही दर्शन घडवणारे ठरत आहे, अशी स्थिती आहे.

 

शहरातल्या २८०० पैकी जवळपास सगळ्याच शाळांत स्नेहसंमेलन साजरे होते. त्यातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे या उपक्रमांवर अधिक प्रेम आहे. त्यांनी ठरवून दिलेल्या नृत्य दिग्दर्शकांचेच मार्गदर्शन, त्यांच्याकडचेच कपडे, ते सांगतील तसेच हवे. त्यामुळे पालकांच्या खिशाला कितीही भुर्दंड पडला तरी शाळेने दिलेल्या सूचना काटेकाेरपणे पालन करणे गरजेचे असते.

 

असा नियम अथवा आदेश नाही
शाळांनी या प्रकारचे नियोजन करावे किंवा सगळ्या गोष्टींचे नियोजन आपल्या हाती घ्यावे, असे कुठलेही आदेश नाहीत. तरीही शाळा जबरदस्ती का करतात? हे अनुत्तरीत आहे. अशा प्रकरणांत पालक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्याचाच गैरफायदा संस्थाचालक घेतात. परिणामी पालकांची कुचंबणा होते.

 

किमान रक्कम नाहीच
एखादा झगा अथवा मुलाचा ड्रेस हा ५०० रुपयांच्या आत खरेदी केल्याचे चित्र फारच दुर्मिळ आहे. जर शाळा या संपूर्ण कपड्यांचे मक्ते एकाकडे देतात. तर त्यांनी कमी दरात हे काम करायला हवे. मात्र तसे होता उलट जास्त लुबाडले जाते.

 

‘तेरी मेरी दोस्ती’चे प्रकरण
ज्यांच्याशी शाळेचे साटेलोटे जमलेले असते त्यांच्यात काही अंशी टक्केवारी ठरलेली असते. हे स्वत: पालक सांगतात. परंतु, पालक तक्रार करणे टाळतात. म्हणूनच आम्ही सांगतो त्याच ठिकाणाहून कपडे आणा, असा शाळांचा रेटा असतो. कारण त्यांचे त्या कपडे तयार करणाऱ्या टेलरशी काही मेतकूट ठरलेले असते.

 

लाखो रुपयांची होते उलाढाल
एका वर्गातील १५ अधिक १५ अशा ३० विद्यार्थांचा हिशेब धरला तर हजार प्रमाणे ३० हजार होतात. मोठ्या शाळेत किमान २००० विद्यार्थी सहज आहेत. प्रत्येकाला स्नेहसंमेलनात सहभागी केलेच जाते. त्याप्रमाणे १००० किंवा २००० असे सहभागी होणारे विद्यार्थी गृहित धरले तर त्यांच्याकडून जमा होणारी रक्कम ही १० ते २० लाख एवढी होते. त्यामुळे यातून जमा होणारे कमीशनही काही लाखांत असते. यातून शाळा कशी लूट करते, हे चित्र यावरून स्पष्ट होते.

 

शाळा-शाळांत ठरलेले लोक
मोठ्या शाळेत ठरलेले नृत्य दिग्दर्शक आणि ठरलेले टेलर असल्याने त्यात वर्षाप्रमाणे कपड्यांच्या किमतीत वाढ होते आहे. त्यात कमी नाही. त्याचा दर्जाही कमी प्रमाणावर असल्याने इतर वेळी या कपड्यांचा उपयोग होत नाही. मात्र तरीही पालकांना या जबरदस्तीच्या गोष्टीकडे वळवले जाते.

 

इंगजी माध्यमात प्रमाण अधिक
मराठीमध्यमांच्या शाळांत याचे प्रमाण थोडेफार कमी आहे. मात्र तुलनेने इंग्रजी माध्यमांच्या शाळांत या लुटीचे प्रमाण अधिक आहे. ते सांगतील तेच गाणे, ते सांगतील तेच नृत्य, ते सांगतील त्याच ठिकाणाहून कपडे आणणे, त्यांना हवे तसेच कपडे घेणे, अशा सगळ्या वर्चस्वामुळे स्नेहसंमेलन बाजूला मात्र पालकांना त्रास अधिक होतो.

 

विद्यार्थी पालकांच्या स्वातंत्र्यावर गदा
एखाद्यापालकांना वाटले की, आपल्या मुलीला वा मुलाला यापेक्षा चांगले वा साधे कमी किमतीतले कपडे द्यावे. तर त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याचा उपयोग करता येत नाही. त्यांनी आणलेले कपडे शाळांना सुसंगत होत नाहीत. एक सारखे दिसत नाहीत. तुमचे एकट्याचेच कपडे वेगळे का? सूचना दिली होती ना, असे विचारून भंडावून सोडतात. त्रास देतात त्यामुळे पालकांना आणि पुढच्या काळात विद्यार्थांनाही त्रास होतो.

 

एक ड्रेस किमान हजार रुपयांचा
ज्या गीतांवर चिमुकले पाय थिरकणार असतात, त्या कपड्यांच्या किमती या हजारांच्या वर असतात. ते भाड्याने मिळू शकतात. मात्र शाळेला आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये असे वाटते. स्नेहसंमेलन चांगले दिसावे म्हणून खास ऑर्डर देऊन कपडे शिवून घेतले जाते. त्यात ज्यांनी याचे काम घेतलेले असते त्यांच्याकडून आणि शाळेकडून जे काही करार होतात त्यात पालकांची खिचडी होते.


... तर शाळांवर करू कारवाई
कोणत्याही शाळेत अशा प्रकारची लूट होत असेल तर त्या शाळेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र पालकांनी पुढे येऊन लेखी तक्रारी कराव्यात. अशा शाळांना माफ केले जाणार नाही.
- सुधा साळुंके, मनपा प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग

बातम्या आणखी आहेत...