सोलापूर - सोलापूर दमाणी नगरजवळील शेटेवस्तीत शनिवारी दुपारी अकराच्या सुमाराला दोन गटांत दगडफेक झाली. लहान मुलांच्या भांडणावरून हा प्रकार घडला. काही काळ तणावाचे वातावरण होते. इलियास शेख (रा. शेटेवस्ती) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. राजू तलाठी, अंबादास तलाठी, चंद्रकांत कांबळे, सूरज कांबळे, महेश पवार यांच्यासह अठरा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
सर्वांनी मिळून मागील भांडणावरून घरावर दगडफेक केली. यात चौघेजण जखमी झाले आहेत. दुसऱ्या घटनेत अनिल तलाठी यांनी फिर्याद दिली आहे. रिझवान गोलंदाज, ताहेर गोलंदाज, काशीम गोलंदाज, सज्जू करनाळ, नुरा गुणकी यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. चारजण जखमी झाले आहेत. सर्वांनी मिळून तलाठी यांच्या घरावर दगडफेक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लहान मुलांमध्ये शुक्रवारी भांडण झाले होते. त्याचे पर्यवसान आज भांडणात झाले. दोन्ही गटांतील पाच जणांना ताब्यात घेतल्याचे फौजदार चावडी पोलिसांनी सांगितले.