आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्तीसाठी शिक्षणमंत्र्यांना घेराव; घोषणांनी वेधले लक्ष!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - 'शिष्यवृत्तीवाचवा, शिक्षण वाचवा' अशा घोषणा देत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)च्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना 'घेराव' घातला. वंचितांची शिष्यवृत्ती बंद करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. याच मागणीसाठी संघटनेने राज्यभर आंदोलन केले आहे.
सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. दुपारी तीन वाजता श्री. तावडे वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. त्या वेळी आंदोलकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. संघटनेचे राज्य सचिव दत्ता चव्हाण, किशोर झेंडेकर, मीरा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी बोलताना श्री. चव्हाण म्हणाले, 147 विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती अतिशय तुटपुंजी आहे. 'अच्छे दिन'ची ग्वाही देत आलेल्या सरकारने गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती मात्र नाकारल्या. शिक्षणाच्या बाजारीकरणात गरिबांची मुले उच्च शिक्षण घेणार कशी? शिक्षणाचा खर्च वाढतच चाललेला आहे. त्यात आर्थिक दुर्बल घटक प्रवाहातून बाहेर फेकला जातो अाहे. शिक्षण हे घटनादत्त हक्क असताना, त्याकडे एवढ्या उदासीनपणे पाहणे योग्य नाही. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष मल्लेशम कारमपुरी, नम्रता निली, मंजुषा नवले, विजय हरसुरे, अमोल केंडले, शाम आडम, राहुल जाधव, जयकुमार साेनकांबळे, वसीम अक्रम, विश्वजित बिराजदार, रामकृष्ण ताटीपामूल, गुंडेराव ताटीपामूल, विकास कलबुर्गी आदी सहभागी झाले होते.
या आहेत मागण्‍या
महागाईच्या निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करा
थकीत शिष्यवृत्ती त्वरेने विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करा
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसींची शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करा
मुस्लिम समाजाचे टक्के आरक्षण कायम ठेवा
शिष्यवृत्ती घोटाळ्यातील दोषींवर ताबडतोब खटले दाखल करा
विडी कामगारांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती कमी आहे, त्यात वाढ करा.
शिष्यवृत्तीसाठी रान पेटवू
सर्वांना मोफत शिक्षण, उच्च शिक्षणात मागासांना आरक्षण, आर्थिक दुर्बलांना शिष्यवृत्ती या घटनादत्त हक्क आहेत. त्या काढून वंचितांना उच्च शिक्षणापासून आणखी वंचित ठेवणे म्हणजे अन्याय आहे. त्याच्या विरोधात राज्यभर आता ठिणगी पडली. सरकारने त्याची दखल घेतली नाही तर रान पेटवू.'' दत्ता चव्हाण, संघटनेचे प्रदेश सचिव