सातारा - ‘शहीद कर्नल संतोष महाडिक दहशतवाद संपवण्यासाठी काश्मिरातील लाेकांचे मतपरिवर्तन करत होते. त्यांना शिक्षण देत होते, असा सामाजिक भान असलेला लष्करी अधिकारी गमावणे ही मोठी हानी आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केले. शहीद महाडिक यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची व्यवस्था बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये केली जाईल. वीरपत्नी स्वाती यांना शिकवण्याची इच्छा असेल, तर तशी संधीही उपलब्ध करून देता येईल,’ अशी ग्वाहीही पवारांनी दिली.
पाेगरवाडी (जि. सातारा) येथे महाडिक परिवाराचे सांत्वन केल्यानंतर ते माध्यमांशी बाेलत हाेते. असहिष्णुतेबाबत अभिनेता अामिर खानच्या विषयावर पत्रकारांनी विचारले असता ‘सध्या अामिरच्या वक्तव्यापेक्षा कर्नल महाडिक यांचा प्रश्न अधिक महत्त्वाचा अाहे,’ एवढेच मार्मिक उत्तर पवारांनी दिले.
पाेगरवाडी येथे जाऊन पवारांनी सुमारे अर्धा तास महाडिक परिवाराशी चर्चा करून त्यांची अास्थेवाईकपणे चाैकशी केली. पत्रकारांशी बाेलताना पवार म्हणाले, ‘संरक्षणमंत्री असताना मी कुपवाडा येथे गेलो होतो, मात्र सध्याची परिस्थिती त्या वेळपेक्षा फारच वेगळी आहे. अशा परिस्थितीत शहीद महाडिक यांनी केवळ लष्कराचे कर्तव्य न बजावता तेथील सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी स्थानिक मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत होते. पर्यटन वाढावे यासाठी धडपडत होते. त्यांचे हे कार्य नक्कीच वाया जाणार नाही. घडलेली घटना दु:खद आहेच मात्र कुटुंबीयांनी खचून न जाता या परिस्थितीस धैर्याने सामाेरे जावे, असे अावाहन करतानाच लष्करातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलून या कुटुंबाला भरीव मदत कशी मिळेल याबाबतही अापण चर्चा करणार असल्याचे पवार म्हणाले.
शहीद संतोष महाडिक यांचे बंधू जयवंत यांच्याशी पवार यांनी संवाद साधला. कौटुंबिक परिस्थिती, ते करत असलेला व्यवसाय, शेतीच्या परिस्थितीची याबाबत चौकशी केली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर घार्गे अादी उपस्थित हाेते.