आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेळगी पोलिस चौकीला चोरून घेतलीय वीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नव्याने सुरू झालेल्या शेळगी पोलिस चौकीने अनधिकृतपणे वीज जोडणी घेतल्याची बाब निदर्शनास आली आहे. विचारणा केली असता वीज जोडणीसाठी अर्ज दिलेला आहे. जोडणी मिळेपर्यंत नगरसेवकांनी महावितरणला सांगून ही सोय करून दिली आहे, असे उत्तर मिळाले. कायद्याचे रक्षण करणारे पोलिस प्रशासन, महावितरण आणि नगरसेवक यांच्याकडूनच वीज चोरीचा प्रकार समोर आला आहे.
प्रजासत्ताक दिनी सायंकाळी शेळगी पोलिस चौकीचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि पोलिस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी काही पोलिस अधिकारी, महावितरणचे कर्मचारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

शेळगी परिसर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे गरजेनुसार पाेलिस विभागाने शेळगी परिसरात नव्याने शेळगी पोलिस चौकी सुरू केली. पण सुरुवातीलाच चोरून वीज घेतल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे. या चौकीच्या शेजारी विद्युत ट्रान्सफार्मर आहे. येथे विजेच्या तारांवर आकडा टाकून वीज जोडणी घेण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकाने असा प्रकार केला तर त्यांच्यावर महावितरणकडून त्वरित फौजदारी कारवाई केली जाते. मात्र हा प्रकार महावितरणच्या डोळ्यांदेखत सुरू आहे.

तर गुन्हा दाखल होईल
^शेळगी पोलिस चौकीने विजेची चोरी केली असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. मात्र असा प्रकार करण्यास आमच्या कुठल्याच अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्यांनी परवानगी दिलेली नाही आणि देणारही नाही. एच. एम. कुडके, कार्यकारीअभियंता, ग्रामीण विभाग