उस्मानाबाद- शिवसेना भूलथापा मारणारा पक्ष नाही, जेवढे बोलून दाखवू तेवढे करून दाखवतो आणि जगाला ओरडून सांगतो. शिवसेनेने शिवजलक्रांतीच्या माध्यमातून काम करून दाखवले. श्रेयाचा संबंधच नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. परंडा येथे जाहीर सभेत ठाकरे बोलत होते.
शिवसेनेच्या माध्यमातून प्रा.तानाजी सावंत प्रतिष्ठानच्या वतीने भूम-परंडा-वाशी तालुक्यात शिवजलक्रांती योजनेची मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली आहे. या कामामुळे मान्सूनपूर्व पावसाने नदी-नाल्यांमध्ये पाणीसाठा झाला आहे. या कामांची पाहणी करण्यासाठी तसेच जलपूजन करण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे शनिवारी (दि.१८) परंड्यात आले होते. यावेळी बावची येथील उल्फा नदीवर जलपूजन झाल्यानंतर परंड्यातील सभेत ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, सरकारच्या पद्धतीने कारभार सुरू आहे. सरकारमध्ये आम्ही आहोत. मात्र, आम्ही डोक्याला हात लावून बसलो नाही. मेहनत करून सगळ्यांना सोबत घेतले. त्यातून शिवजलक्रांतीसारखे यश पदरात पडले. हे पाणी काही दिवस उपयोगी पडेल. काम झाले नसते तर पडून गेलेल्या पावसाचे पाणी अडले नसते. विहिरींना ७० फूट पाणी आले असून शिवसेनेने ते करून दाखवले. ज्यांनी करून दाखवले त्यांच्या अंगावर आल्यास शिवसैनिक पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत.
देशात, राज्यात उद्योगधंदे आले पाहिजेत. शासनाने मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रचा मोठा समारंभ घेतला. मात्र, गोरगरिबांना रोजीरोटी मिळाली पाहिजे. ज्याप्रमाणे उद्योग व्यवसायासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. उद्योगासाठी बोलावता त्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी मोठे जलतज्ज्ञ बोलवा, सोबत शेतकऱ्यांचेही मार्गदर्शन घ्या, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. शिवजलक्रांती योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल.
परंडा तालुक्यातील साचलेले पाणी पाहून समाधान वाटले. अशा कामांचे कौतुकच करावे. एवढे काम कोणीच केले नाही. श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही. जे होते त्याचीच घोषणा आम्ही करतो, असे ते म्हणाले. ही तर कामाची सुरुवात असून अजून काम पूर्ण झालेले नाही. भूजल पातळी वाढेपर्यंत शिवसेना शिवजलक्रांतीची कामे करणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी मर्दाप्रमाणे उभे रहा, असे भावनिक आवाहन ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, सोलापूरचे संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर, गौरीश शानबाग, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, ज्ञानेश्वर पाटील, राजाभाऊ राऊत, प्रा. शिवाजी सावंत आदी उपस्थित होते. बावची येथील शिवसेनेच्या शिवजलक्रांती योजनेच्या पाण्याचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जलपूजन करून त्यातील पाणी कलशाद्वारे मुंबईला नेण्यात येणार आहे. शिवसेनेचा रविवारी (दि.१९) वर्धापनदिन असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळावर हा कलश ठेवण्यात येणार आहे.
शिवसेनेतीलगटबाजी चव्हाट्यावर : परंडातालुक्यात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि प्रा. तानाजी सावंत यांच्यामध्ये गटबाजी निर्माण झाल्याचे गेल्या काही महिन्यापासून बोलले जात होते. शनिवारी याचा प्रत्यय खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आला. प्रा. तानाजी सावंत यांनी परंड्यासह भूम, वाशी तालुक्यात स्वखर्चाने शिवजलक्रांती योजनेची कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना या कामाचे श्रेय देण्यात येत आहे. प्रा. सावंत प्रास्ताविक करण्यासाठी उठल्यानंतर ज्ञानेश्वर पाटील समर्थकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रा. सावंत यांनी ‘ज्ञानेश्वर पाटील तुमच्यामुळे होत आहे, हे थांबवा’ अशा शब्दांत सुनावले. यावेळी गांेधळ निर्माण झाला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील व्यासपीठावरून खाली उतरले. त्यांनी तसेच जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, अनिल खोचरे यांनी शिवसैनिकांना शांत केले. जिल्ह्यात शिवसेनेत तीन गट असून, या गटबाजीमुळे शिवसैनिकांत संभ्रमाचे वातावरण आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या परिस्थितीवर काही बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी गटबाजीवर बोलता तानाजी सावंत यांचे भाषणातून चारवेळा कौतुक केले. ज्ञानेश्वर पाटील यांचा नामोल्लेख टाळला.
शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले.
पहिली मोठी सभा
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी अलिशान भव्यदिव्य शिवपीठ उभारण्यात आले होते. प्रेक्षकांना सभा दिसावी यासाठी मोठे दोन स्क्रीन लावले होते. शहरात सर्वत्र स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. आगमनानिमित्त सावंत बंधूंचे तसेच माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे डिजिटल बॅनर लावले होते. सभेसाठी हजार शिवसैनिकांची उपस्थिती होती. तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
दुष्काळाचे संकट दूर कर!
जिल्ह्यात येतो तेव्हा तुळजाभवानी मातेकडे दुष्काळाचे संकट दूर कर, शेतकऱ्यांचा दोष नाही, त्यांच्यावरचा दुष्काळ हटव, असे मागणे मागतो. पंकजाताई मुंडे म्हणाल्या त्याप्रमाणे मल्ल्या कर्ज बुडवून पळून जातो, त्याला काेणीही पकडत नाही. इकडे आमच्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या मागे बँका, पतसंस्था, सावकार लागलेले असतात. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. आत्महत्या करू नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले.