आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची दोन स्वतंत्र आंदोलने; सकाळी अन् दुपारी वाजले ढोल, गटबाजी चव्हाट्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या गाव आणि तालुकानिहाय लावाव्यात, या मागणीसाठी शिवसेनेने सोमवारी दोन स्वतंत्र आंदोलने केली. पहिले आंदोलन सकाळी अकराला जिल्हाप्रमुख महेश कोठे, शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यानंतर तासाभराने दुसरे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील कार्यकर्त्यांना घेऊन आले. अशा पद्धतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर दोनदा ढोल वाजले. दोन स्वतंत्र निवेदने देण्यात आली.
 
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती बँकांसमोर ढोल वाजवून या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने झाली. सोलापुरात मात्र दोन स्वतंत्र गटांनी आंदोलन करून पक्षात फूट असल्याकडे लक्ष वेधले. त्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आलीच, नेत्यांतील मतभेदही दिसून आले. पहिल्या आंदोलनात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, उपजिल्हाप्रमुख सुनील शेळके, उमेश गायकवाड, शाहू शिंदे, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे आदी होते.
 
दुसऱ्या आंदोलनात पक्षाच्या जिल्हाभरातील नेते सहभागी झाले होते. प्रा. पी. बी. रोंगे, पंढरपूरचे धनंजय डिकोळे, मनोज शेजवाल, दीपक गायकवाड, संभाजी शिंदे, काकासाहेब देशमुख, शिवाजी नीळ, विक्रांत काकडे, सदानंद येलुरे, सूर्यकांत घाडगे, नामदेव वाघमारे, राजा गायकवाड, संतोष गणाचार्य, प्रवीण कटारे, सोपान निकते, गंगाराम चौगुले, राजू गुंड, सुनील गायकवाड, धनराज जानकर, श्रीकांत ननवरे, संजय पोळ, वेताळ भगत, वजीर शेख, हुकूमचंद राठोड आदींचा त्यात समावेश होता.
 
सकाळच्या आंदोलनात सहभागी नसलेले लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी दुपारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी लावण्याच्या मुद्द्यावरच आंदोलन केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयासमोर सोमवारी सकाळी शिवसेनेने महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीची यादी लावण्यासाठी आंदोलन केले.
 
अंतिम आदेश कुठाय?
कर्जमाफी संदर्भात अाणखी काही बाबी स्पष्ट करण्याची प्रक्रिया शासन पातळीवर सुरू आहे. त्याचा अंतिम आदेशच अजून पारित झालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या याद्या कशा लावायच्या हा प्रश्न आहे. शिवसेना राज्यातल्या सत्तेत आहे. त्याच्या नेत्यांनी कर्जमाफीची प्रक्रिया सुलभ करून घ्यावी. सर्वांना त्याचा लाभ मिळेल, याकडे पाहावे. त्यानंतर आंदोलन करावे.”
- राजन पाटील, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक
 
जिल्ह्यातील लोकांना येण्यास उशीर झाला
सकाळच्याआंदोलनासाठीजिल्ह्यातील नेत्यांना येण्यास उशीर झाला. शिवाय कोठे यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जाणे अनिवार्य होते. म्हणून सकाळी त्यांचे आंदोलन झाले. दुपारी तालुकानिहाय नेते आले. त्यांना घेऊन पुन्हा लक्ष वेधले.”
- लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख
 
बरडे इकडे नाहीत तिकडेही नाहीत...
पक्षात एकसुरीपणा असावा, यासाठी पुरुषोत्तम बरडे समन्वय प्रमुख म्हणून काम पाहतात. परंतु सोमवारी झालेल्या या दोन्ही आंदोलनात ते नव्हते, हे विशेष. पक्षात तीन जिल्हाप्रमुख, दोन शहरप्रमुख अाहेत. परंतु त्यांच्यात अद्याप कुठलाच समन्वय नाही, हे बरडे यांच्या अनुपस्थितीने जाणवले.

शहर व जिल्‍ह्याचे स्‍वतंत्र आंदोलन
शेतकऱ्यांसाठी सर्वांनी आंदोलन करावे, असे आदेश आहेत. त्यामुळेच शहर आणि जिल्हा अशा दोन्ही स्तरावर आंदोलने झाली. त्यात शहर आणि जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुखांचा समावेश झाला. कोणीही नेता घरी बसलेला नव्हता.
 
बातम्या आणखी आहेत...