अक्कलकोटला तीन आठवड्यांतून पाणीपुरवठा होणार ही बातमी आकाशवाणीवर ऐकली आणि पोटात खड्डा पडला. कुठं मनच लागेना. सोलापूर शहरापासून पाऊण एक तासाच्या अंतरावरच्या गावात ही परिस्थिती उद्भवली आहे आणि
आपण अजूनही पाण्याच्या वापरासंदर्भात जागरूक होत नाही. जलसंपदा विभागाच्या वतीने सप्ताह आयोजित केला गेलाय. सगळेच गांभीर्याने काम करताहेत, सरकार काळजी घेत आहे. पण मग आपलं काहीच कर्तव्य नाही का? आपला पाणी बचतीच्या संदर्भात काहीच सहभाग असणार नाही का? आपण फक्त हक्कांची जाणीव ठेवणार मग कर्तव्याची?
पाणी बचतआणि पाण्याचा वापर, पाण्याची साठवण या संदर्भात मला काही सूचवावसं वाटतंय.
आज अनेक घरांमध्ये नळ गळताहेत. पण त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहात नाही. बैठी घरं, फ्लॅट्समध्ये नळांची गळती, टाक्यावरून तासन तास पाणी वाहाणं या गोष्टी सर्रास पहायला मिळतात. यावर उपाय महापालिका आणि सार्वजनिक संस्था, मंडळ यांच्या सहकार्याने ४-५ लोकांची टीम प्रत्येक बिल्डिंगमध्ये जावी. सोबत प्लंबर १-२ असावेत.
टीमने घरात जाऊन गळके नळ पाणी भरल्यानंतर टाकीचं तोंड बंद करणारा फुगा आहे का याची पाहणी करावी. तसे आढळल्यास त्याचक्षणी २००० रु. दंड करावा. नळ दुरुस्त करावा. लोकसहभाग घेऊन अशा अनेक टीम तयार करता येतील.
हे करण्याआधी किमान आठ दिवस आधी वर्तमानपत्राद्वारे, आकाशवाणीद्वारे लोकांना या मोहिमेसंदर्भात माहिती द्यावी.
बोअर घेतल्यानंतर पाण्याची पुनर्भरण यंत्रणा केली आहे का? हे प्रत्यक्ष पाहून खात्री करावी अन्यथा मोठा दंड आकारावा आणि पुनर्भरण यंत्रणा करण्याची सक्ती करावी. डिव्हायडरमध्ये पाण्याचा टँकर आणि मोठ्या पाइपनं पाणी देऊन पाण्याची नासाडी करण्यापेक्षा, अगदी छोट्या पाइपद्वारे ठिबक सिंचन करून पाणी द्यावे. छोटी मडकी डिव्हायडरमध्ये चार- एक फुटावर थोडीशी खोल ठेवली त्यात दोन दिवसाआड पाणी भरलं तरीही वर्षाचे बारा महिने डिव्हायडरमध्ये झाडी हिरवीगार राहतील. डोळ्यांना सुखावतील.
शाळेतून लहान मुलांशी रोज शिक्षकांनी पाणी बचत, संवर्धन याविषयी १० मिनिटं बोलावंच. मुलांना प्रयत्न करण्यास उद्युक्त करून त्यांच्या या प्रयत्नाचं कौतुक म्हणून सगळ्या शाळेसमोर छोटसं बक्षीस देऊन त्याचं अभिनंदन करावे.
मागे मी वाचल होतं की, सुरत शहरात घर, बिल्डिंग बांधताना घराच्या बिल्डिंगच्या चारी बाजूला भिंतीलगत दोन फूट जागा मोकळी सोडली जायची. तिथं फरशीकरण केलं जात नव्हतं. म्हणजे पावसाचं पाणी येथे पडून ते जमिनीत मुरेल. आजकाल रस्ते डांबरी, अपार्टमेंटस् घरं यांच्या चहुबाजूला गच्च फरशीकरण. त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याचं प्रमाण नगण्य झालंय. असा प्रयत्न आपल्याकडे जाणीवपूर्वक व्हायला हवा. महिलांनी भाज्या धुणं, हात धुणं, भांडी विसळणं हे पाणी साठवून झाडांना घालावे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी वापरण्यासाठी पाण्याचं मीटर सक्तीचं करा. पैसे देऊन पाणी घेतलं तरच पाण्याचं महत्त्व कळेल. आपलं शरीर ७० टक्के पाण्यानं व्यापलेलं आहे. पृथ्वीवरही ७० टक्के पाणी आहे. आपल्या शरीरातलं पाणी उलट्या जुलाबानं कमी झालं. तर डिहायड्रेड होऊन, वेळेवर उपचार नाही झाले तर प्राणाशी बेततं. आता आपल्या सोलापूरपुरता विचार केला तर आपली ही भूमाता डिहायड्रेड होत आहे. वेळेवर आपण तिला जलजीवन नाही दिलं तर तिच्या प्राणाशी बेतेल. तिच्या प्राणावर बेतलं तर आपले काय हाल होतील, याचा विचार करा. कदाचित विचार करण्यासाठी आपलं जीवन, आपलं अस्तित्व शिल्लक राहील का? याचा विचार करा आणि पाणी खूप खूप काटकसरीने वापरा. पाणी वाचवा, पाणी वाढवा.