आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल मंदिरालाही लेप, ‘पुरातत्त्व’कडून पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाच्या येथील मंदिरातील भिंतीला दिलेला आॅइलपेंट काढण्यासाठी संपूर्ण मंदिराच्या स्वच्छतेसाठी औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक एम. आर. सिंग यांनी बुधवारी मंदिराला भेट देऊन त्याची पाहणी केली.
दरम्यान, मंदिर समितीने मंदिरातील भिंतींचा जुना आॅइलपेंट काढून संपूर्ण मंदिराच्या स्वच्छतेसाठी पाहणी करण्याविषयी औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाला पत्र पाठवले होते. त्यानुसार कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सिंग हे येथे आले होते. त्यांनी मंदिरास भेट देऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.

या वेळी त्यांनी मंदिरास आतील आणि बाहेरील बाजूच्या कोणकोणत्या भिंतींना आॅइलपेंट दिला आहे, भिंतींना कुठे तेलाचे, दह्यादूधाचे चिकट डाग आहेत, याची संपूर्ण मंदिरात फिरून पाहणी केली. सिंग म्हणाले, आपण पाहणीचा अहवाल पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठांना सादर करू. त्यात मंदिराच्या संपूर्ण स्वच्छतेसाठी काय करावे लागेल, त्यासाठी किती खर्च अपेक्षित असेल याची माहिती राहील. त्याला वरिष्ठांकडून मान्यता मिळाल्यानंतर मंदिर समितीशी संपर्क साधून या सर्व बाबींची लेखी माहिती दिली जाईल. मंदिर समितीने मान्यता आणि काम करण्यास सांगितल्यानंतर हे काम केले जाईल.

श्री विठ्ठल मूर्ती संवर्धनासाठी २०१२ मध्ये सिंग यांनी सिलिकॉन लेप प्रक्रिया केली. त्यासाठी वॅकर बी एस २९० हे रसायन वापरले. भविष्यात गरज भासल्यास श्री विठ्ठलाच्या मूर्तीलाही नुकतेच कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मूर्तीप्रमाणेच नैसर्गिक घटकांपासून बनवलेला लेपच दिला जाईल, असेही एम. आर. सिंग यांनी सांगितले. मात्र श्री विठ्ठलमूर्तीला पुन्हा लेप देण्याविषयी मंदिर समितीशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सूचनांचे पालन नाही
आषाढी यात्रेनंतर बुधवारी मंदिर समितीकडून श्री विठ्ठलाची प्रक्षाळपूजा झाली. त्याचवेळी अधीक्षक सिंग हे पाहणीसाठी मंदिरात होते. तेव्हा श्री विठ्ठल मूर्तीला गरम पाण्याने स्नान घालण्यात येत होते. त्यावर दही, दूध घालताना आपण पाहिल्याचे सिंग यांनी सांिगतले. गाभाऱ्यातील ग्रेनाइटही काढून टाकले नाही. पुरातत्त्व विभागाने २०१२ मधील लेप प्रक्रियेनंतर मंदिर समितीला केलेल्या सूचनांचे नीट पालन होत नसल्याबद्दल सिंग यांनी नाराजी व्यक्त केली.