आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही उघडून पाहिलीच नाही ९०० वर्षांपूर्वी दिलेली “गिफ्ट’’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवयोगी सिद्धराम हे योगशास्त्राचे जाणकार आणि साधक होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी काही वर्षे संजीवन समाधी घेतलेले आध्यात्मिक महापुरुष म्हणूनही त्यांचा उल्लेख करण्यात येतो. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेली सोलापूरनगरी (प्राचीन नाव सोन्नलगी) ही त्यांची कर्मभूमी. त्यांनी ६८ शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली. देवळे बांधली, चार हजार लोकांच्या श्रमदानातून तलाव खोदले, गरीब निराश्रितांसाठी अन्नछत्र सुरू केले. सामुदायिक विवाहसोहळ्याची सुरुवात केली. बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांचे समकालीन असलेले सिद्धराम हे समाजसुधारक योगी होते. तसेच, ते एक संवेदनशील भावकवीही होते. त्यांच्या अलौकिक कार्यामुळे ते सोलापूरचे ग्रामदैवत बनले. सिद्धेश्वर आणि सिद्धरामेश्वर ही नावे रूढ होऊन त्यांना ईश्वररूप मानले गेले.

कोणत्याही महापुरुषाला ईश्वर मानले की केवळ त्या महापुरुषाचा जयजयकार करून आपली जबाबदारी झटकण्याची प्रवत्ती समाजात असते. शिवयोगी सिद्धराम यांनी समाजाची ही मानसिकता जाणत होते. म्हणूनच त्यांनी जीवन जगण्याची शाश्वत मूल्ये आपल्यासमोर ठेवली. त्यांनी कन्नड भाषेतून ६८ हजार वचनांची निर्मिती केली; परंतु त्यातील केवळ १३०० वचनेच आज उपलब्ध आहेत. त्यांच्या या वचनांतून शिवभक्ती डोकावते तसे तत्त्वचिंतनाचेही दर्शन घडते. वेद आणि उपनिषदे यातील चिरंतन तत्त्वज्ञान ठायी ठायी व्यक्त होते. संस्कृत आणि गणित यावर त्यांचे प्रभुत्व असल्याचे वचनांमधून प्रत्ययाला येते. प्रमाणबद्ध बोलणे म्हणजे वचन. वचन म्हणजे केवळ गद्य नव्हे किंवा पद्यही नाही, पद्याचा गंध असलेले गद्य म्हणजे वचन. आध्यात्मिक भावगीत म्हणजे वचन.

कर्मयोगी सिद्धरामांच्या वचनांमध्ये अध्यात्म आणि व्यवहार यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. संस्कृत भाषेमध्ये असलेले जीवनविषयक मूलभूत तत्त्वे सिद्धरामांनी लोकभाषेत आणली. मानवी जीवनाला उन्नत आणि अर्थपूर्ण करणारे विचार प्रासादिक भाषेतून मांडली. या वचनांमधून कधी ते आपल्याच मनाला उपदेश करतात तर कधी दंभाचारावर प्रहार करतात. काही वचनांमध्ये तर्कशुद्ध युक्तिवाद करून, उदाहरणे देऊन विवेकबुद्धी जागवतात.
‘कीर्ती मिळवणाऱ्याचे जीवन विटलेल्या शिळ्या अन्नासारखे असते.’ प्रसिद्धी आणि कीर्तीसोबत येणाऱ्या दोषांपासूनही ते सावध करतात. ते म्हणतात, ‘लोकप्रियता ही शस्त्राने केलेल्या जखमेसारखी असते. ती फुलांच्या परिमळासारखीही असते.’

अनुभवहीन ज्ञान काय कामाचे
शिक्षणासंबंधीशिवयोगी सिद्धराम म्हणतात, ‘शिक्षण हे सद्गुणांच्या प्राप्तीसाठी असते, ते कान फुंकण्यासाठी असते काय ?’ आजच्या शिक्षणपद्धतीत सद्गुणप्राप्तीचा विचार होणे आवश्यक झाले आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाण तर वाढत आहे. परंतु भ्रष्टाचार, गुन्हेगारी फोफावत असल्याचेही दिसत आहे. शिक्षणातून चांगला माणूस घडला पाहिजे. विद्येचा वापर करून चुगली करणे, भांडणे लावणे, दुसऱ्याचे वाईट करणे होत असेल तर त्याला शिक्षण म्हणता येणार नाही, असे त्यांना सांगायचे आहे. (स्वामी विवेकानंद शिक्षणाविषयी म्हणतात, ‘माणूस घडवणारे, चारित्र्य निर्माण करणारे आणि चांगले विचार आत्मसात करायला लावणारे शिक्षण हवे. मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला माहितीचा मारा म्हणजे शिक्षण नव्हे.’) अनुभवाशिवायचे ज्ञान हे फुकाचे असते. याचा अनुभव आपल्याला पदोपदी येतो. समाजाचे बारकाईने अवलोकन केलेल्या सिद्धरामांना याची जाणीव होती. म्हणूनच ते म्हणतात, विद्याभ्यास करून जो अनुभवसंपन्न होत नाही तो पिशाच्च होय.

झुगारल्या अवास्तव कल्पना
अनुभव पुस्तकात मिळत नाही, असेही ते सांगतात. याचवेळी ते ज्ञानाचाही गौरव करतात. ते म्हणतात, ज्ञानशून्य क्रिया फलप्रद नसते. ज्ञानी माणसाचे वागणे नम्र असावे अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात. व्यवहारी जगाचा अनुभव नसल्याने अपयशी ठरल्याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय पुराणे आणि साहित्यात येणाऱ्या संकल्पनांची कालसुसंगत आणि तर्कशुद्ध मांडणीही कवी सिद्धराम करतात. चिरंजीव या संकल्पनेबद्दल ते म्हणतात, ‘चिरंजीव म्हणजे निरोगी, सशक्त आणि दीर्घकाळ जगणारा मनुष्य; मृत्यूवर मात करणारा नव्हे!’ या वचनातून ते अवास्तव कल्पना झुगारून देतात, त्याचवेळी आरोग्यदायी जीवनाचा गौरवही करतात. अस्पृश्यतेसारख्या समाजविघातक प्रथेविषयी प्रबोधन करताना ते म्हणतात, ‘कोणी शिवले म्हणून पाण्यात बुडाल्याने त्यापासून मुक्ती मिळते काय? एखाद्याचे मन दुखवून किंवा एखाद्याचे घर बुडवून गंगेत स्नान केल्याने पापमुक्त होता येणार नाही,’ असेही ते बजावतात.
सिद्धारामभै. पाटील,
मुख्य उपसंपादक, दिव्य मराठी