आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धरामेश्वर स्थापित लिंगांना तैलाभिषेक, उत्साही वातावरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामदैवत,शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी स्थापलेल्या ६८ लिंगांचा तैलाभिषेक गुरुवारी उत्साहात झाला. मानकरी, सेवेकरी भाविक यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर यात्रेतील हा महत्त्वाचा विधी झाला. यावेळी हर्र बोला हर्रचा आणि सिद्धरामांचा जयघोष सुरू होता. 

सकाळी साडेआठच्या सुमारास उत्तर कसबा परिसरातील शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात सातही नंदीध्वज आले. तेथे सर्व नंदीध्वजांचे औक्षण केले. पुष्पहार अर्पण करून पूजा झाली. 
यावेळी महापौर प्रा. सुशीला आबुटे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विकास हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू आदी उपस्थित होते. 

सकाळी नऊच्या सुमारास पहिल्या दुसऱ्या नंदीध्वजाचे वाड्यात पूजन झाले. तेथून हे सर्व नंदीध्वज बाळीवेस मार्गे, दाते गणपतीमार्गे सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. सर्वात अग्रभागी पंचाचार्य ध्वज त्यामागे पालखी, वाजंत्री होते. जागोजागी भाविक नंदीध्वजांना बाशिंग, हार अर्पण करीत तेलदान करीत होते. दुपारी एकच्या सुमारास नंदीध्वज सम्मती कट्टामार्गे मंदिरात दाखल झाले. विविध समाजातील मानकऱ्यांना विड्याचा मान देण्यात आला. त्यानंतर पहिल्या अमृत लिंगाचा तैलाभिषेक झाला. त्यानंतर शहरभर फिरून उर्वरित ६७ लिंगांचे पूजन करण्यात आले. 

आज दुपारी अक्षता सोहळा 
शुक्रवारी दुपारी साधारण एक ते दोनच्या दरम्यान संमती कट्टा येथे विवाह सोहळा होत असून मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी नियोजन केले आहे. 

विड्याचा मान सरकारी आहेर 
जिल्हाधिकाऱ्यांकडून सरकारी आहेर मानकऱ्यांना देण्यात आला. मंदिरात आलेल्या समाजबांधवांना मानकऱ्यांना मानाचे विडे देण्यात आले. सकाळी बाळीवेस येथून नंदीध्वज निघाल्यावर नंदीध्वजास खोबरे वाट्या आणि लिंबू, खारकाच्या हाराचे वजन पेलल्याने उचलतानाच त्याचा तोल गेला. परंतू सेवेकऱ्यांच्या सजगतेमुळे काेणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

मेरी अावाज सुनो 
यंदा पहिल्यांदाच या तैलाभिषेक मिरवणूक कार्यक्रमात विविध गीते सादर करणाऱ्या मेरी आवाज सुनो या वाद्यवृंदाचा ताफा वाहनासह दाखल झाला होता. 
 
रस्त्यावर दिसले छोटे नंदीध्वज 
मानाच्या सातही नंदीध्वजांबरोबर रस्त्यावर छोटे नंदीध्वज विकताना दिसत होते. तसेच या यात्रेत सहभागी झालेल्या बालकांनीही ते छोटे नंदीध्वज पेलत आनंद अनुभवला. 
बातम्या आणखी आहेत...