आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामदैवताच्या विवाह साेहळ्याला भक्तसागर, ‘हर्र बोला हर्र’चा घोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह शुक्रवारी लागला. ‘एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र’चा गजर करीत भक्तांचा जणू सागरच उसळला. दुुपारी मंदिर परिसरातील तलावाच्या काठी संमती कट्ट्यावर हा साेहळा रंगला. डोळे भरून पाहण्यासाठी भक्तगण आतूर झाला होता. ‘दिड्डम दिड्डम... सत्यम, सत्यम...’चा उच्चार होताच हजारो हात उंचावले. सोहळ्याच्या दिशेने मंगल अक्षता आल्या. तांदूळ आणि तिळगुळाच्या रूपाने. नेत्र दीपवणारा हा सोहळा याचि देहि, याचि डोळा पाहिल्याचा आनंद भक्तांना झाला. 
 
सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील प्रमुख आकर्षण असणाऱ्या या सोहळ्यासाठी सोलापूर आणि शेजारच्या कर्नाटकातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाराबंदीतील पुरुष मंडळी आणि खण साडीतल्या महिलांनी या धार्मिक सोहळ्याची उंची वाढवली होती. मानकरी हिरेहब्बू, देशमुख, शेटे आणि कुंभार बांधव पारंपरिक वेष परिधान करून ९०० वर्षांपूर्वीची परंपरा पुढे नेत होते. 

भक्तांचा प्रचंड उत्साह अन् अलोट गर्दीत धार्मिक विधी झाले. राजशेखर हिरेहब्बू आणि राजशेखर देशमुख यांनी गंगापूजन आणि सुगडी पूजन केले. त्यानंतर कुंभारांना मानाचा विडा दिला. देशमुखांनी सुहास शेटे यांच्या हाती संमती दिली. संमती कट्ट्यावर त्याचे वाचन झाले. त्यानंतर कानडी भाषेत मंगलाष्टका म्हटल्या. बहुभाषिक सोलापूर शहरातील या सोहळ्यासाठी सर्व स्तरातील भक्तगण होते. बडी राजकीय मंडळीही उपस्थित होती. बसवराजशास्त्री हिरेमठ यांनी सूत्रे सांभाळली होती. 

संमती कट्ट्याजवळ पोलिसांचे वाॅच टाॅवरवरून गर्दीवर लक्ष 
सिद्धेश्वर मंदिर, संमती कट्टा परिसर. पावलोपावली पोलिस. हजारो भाविकांची गर्दी. महिला, लहान मुले यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ठिकाणी वाॅच टाॅवर ठेवले होते. दुर्बिणीच्या साह्याने गर्दीतील बारीक हालचाली टिपण्यात येत होत्या. त्याव्दारे पोलिस वाॅकीटाॅकीवर संदेश देऊन गर्दी हटवणे, रस्ता मोकळा करून देणे, चोरांवर लक्ष ठेवणे, अशी कामे करताना दिसत होते. या टीमवर्कमुळे अक्षता सोहळा बंदोबस्त यशस्वी झाला. पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर हे परिसरातील भगिनी समाज मंदिराच्या गेटजवळ उभारलेल्या टाॅवरवर थांबून हालचालींवर लक्ष ठेवून होते. यात्रा मार्ग आणि परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. 

महिलांची उपस्थिती 
महिलांनी आपल्या देवबाप्पांच्या विवाह सोहळ्यास गर्दी केली होती. काहीनी लग्न कार्याचे आमंत्रण आणि बाशिंग काठीला लावून सिद्धेश्वरांचा आशीर्वाद घेतला. संमती कट्ट्याच्या उजव्या बाजूला महिलांसाठी व्यवस्था होती. महिला पोलिस कॉन्स्टेबल यांचा बंदोबस्त होता. सहायक आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर आणि उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांची उपस्थिती होती. 

फडकुले बिल्डिंगवर शिंदे, पालकमंत्री जमिनीवर 
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे नेहमीप्रमाणे डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहाच्या इमारतीवर बसून होते. त्यांच्यासाठी मांडवाची सोय करण्यात आली होती. महापालिका निवडणुकीतील इच्छुकांच्या गराड्यातून ते आले. सोहळा आटोपून गेले. संमती कट्ट्यासमोर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मात्र जमिनीवरच बसकण मारली होती. खासदार शरद बनसोडे यांची जागा दुसऱ्याच ठिकाणी होती. आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार शिवशरण पाटील आदी खालीच बसले होते. 

काठ्या आल्या वेळेत, आज हळद काढणार 
अक्षतासोहळ्यासाठी यंदा नंदीध्वज संमती कट्ट्यावर वेळेत आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात दुपारी दीडच्या सुमारास या काठ्यांचे आगमन झाले. दोन वाजता अक्षता सोहळा झाल्यानंतर नंदीध्वजधारकांनी मंदिर प्रदक्षिणा घातली. मंदिरासमोरील अमृतलिंगाला आणि गाभाऱ्यातील मूळमूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. तिथे विसावा घेऊन या काठ्या पुन्हा ६८ लिंगांच्या दर्शनासाठी रवाना झाल्या. शनिवारी पहाटे पाचला या काठ्या हिरेहब्बू वाड्यात येतील. सकाळी सिद्धेश्वर तलावात हळद काढण्याचा विधी होईल. त्यानंतर संध्याकाळी होमहवन होणार आहे. 

नंदीध्वज मार्गावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त 
सकाळीनंदीध्वज मार्गस्थ झाल्यानंतर मुख्य चौकातून मिरवणूक जाताना वाहतूक अडवून पर्यायी मार्गावरून वळवण्यात येत होते. संमती कट्टा, पंचकट्टा, होम मैदान, डफरीन चौक, डाॅ. अांबेडकर चौक, चार पुतळा परिसर, सिद्धेश्वर मंदिर संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त होता. साध्या वेषातील महिला पोलिस महिलांच्या गर्दीत थांबून होते. नंदीध्वज मिरवणुकीत बाराबंदी वेषात पोलिस बंदोबस्ताला होते. पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, पौर्णिमा चौगुले या बंदोबस्ताचा अाढावा घेताना दिसत होते. बारीक घटनांवर लक्ष ठेवून होते. सहायक अायुक्त, पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, फौजदार, कर्मचारी यांच्याकडे सेक्टर पद्धतीने बंदोबस्त दिला होता. महिला पोलिस सुनीता अाौसेकर ध्वनिक्षेपकावरून सावधगिरीच्या सूचना देत होत्या. पाच मुले हरवली होती. त्याची सूचना दिल्यामुळे पालकांनी पोलिसांशी संपर्क केला, ती मुलेही सापडली. 

संस्कार भारतीची ‘कॅशलेस’ रंगावली गाजली 
संस्कार भारतीने रेखाटलेल्या ‘कॅशलेस’ रांगोळीने दाद मिळवली. हिरेहब्बू वाडा ते संमती कट्ट्यापर्यंत १५० स्वयंसेवकांनी मिळून १००० किलो रंग वापरला तर १०० पोती पाच बोटी रांगोळी वापरली. 
बातम्या आणखी आहेत...