आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रेनिमित्त कुंभारवाड्यात विधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचा अक्षता सोहळ्यासाठी कुंभारवाड्यातही विविध कार्यक्रम होतात. देशमुख, शेटे, हिरेहब्बू वाडा आहे त्याचप्रमाणे कुंभारवाड्यालाही महत्त्व आहे. या अक्षता सोहळ्याच्या निमित्ताने मुलीकडून काही घ्यायचे नसून मुलाकडून मुलीला द्यायचे असते, हा संदेश देण्यात आल्याची माहिती मल्लिकार्जुन कुंभार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. 

सिद्धरामेश्वर यांनी स्थापलेल्या ६८ लिंगांच्या तैलाभिषेकासाठी १० जानेवारीला कुंभार कुटुंबाकडून ५६ घागरींची पूजा करून हळद आणि तेल घालून हिरेहब्बूंना देण्यात आल्या. घागर मानकरी राजशेखर शिवशेट्टी यांनी स्वीकारली. घागरींमध्ये भक्तगण तेल आणि हळद घालतात. हे घेऊन हिरेहब्बू तैलाभिषेक करतात. हा सोहळा गुरुवारी होणार आहे. सिद्धेश्वर महाराजांनी विवाह सोहळ्यातील तैलाभिषेक स्वत:ला करून घेण्यास नकार देत लिंगांना देण्याची सूचना केल्याचे सांगितले जाते. त्यानुसार हा विधी होणार आहे. 

१३ जानेवारी रोजी अक्षता सोहळ्यापूर्वी कुंभारवाड्याजवळ नंदीध्वजांची, पालखीची पूजा होईल. नंदीध्वजास खोबरे, लिंबूचा हार आणि सुगडी पूजा होईल. अक्षता सोहळ्यानंतर पंचामृत अभिषेक होणार आहे. अमृतलिंगाला अभिषेक करून ६८ लिंगांच्या तैलाभिषेकाला सुरुवात होईल. प्रथेप्रमाणे पंचामृत घागर सुद्धा कुंभारवाड्यातूनच दिली जाईल. त्यानंतर भक्तगण पंचामृत घालतील. 

कुंभार कन्येसह विवाह 
योगी सिद्धेश्वर महाराज दररोज ध्यानधारणा करीत असत. तेव्हा त्यांच्या साधनागृहाबाहेर सडा-संमार्जन करून रांगोळी रेखाटली जात असे. ती एक कुमारिका करे. सिद्धेश्वर महाराजांनी तिची विचारपूस केली. तिने आपण कुंभारकन्या असल्याचे सांगून त्यांच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. महाराजांनी विवाहास नकार दिला. परंतु कुंभारकन्येचा हट्ट पाहता अखेर महाराजांनी आपल्या योगदंडाबरोबर विवाह करण्यास अनुमती दिली. त्याप्रमाणे विवाह सोहळा झाला. नंतर कुंभारकन्या होमकुंडात आहुती देत सती गेली. 

सामाजिक संदेश 
सिद्धेश्वर महाराज आणि कुंभारकन्या (कुमारव्वा) यांचा विवाह हा सामाजिक संदेश देणारा आहे. माहेरच्या लोकांचा आणि सासरच्या लोकांना किती मान दिला जातो, हे दाखवून देण्यात आले आहे. तसेच होम विधीच्यावेळी मंदीर समितीकडून कुंभारकन्येस सौभाग्याचे अलंकार दिले जातात. यावरून मुलीला देण्याचा संदेश मिळतो.”