आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधला सिद्धरामेश्वरांच्या विवाहसोहळ्याचा बस्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामदैवतश्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या लग्नाचा बस्ता शनिवारी मंगळवार पेठेजवळील मोगले साडी सेंटर येथे बांधण्यात आला. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मंदिर समितीची पंच मंडळी जमा झाली. त्यांनी कपड्यांचा बस्ता आणि अन्य खरेदी केली. 

या वेळी सोमशंकर देशमुख, बाळासाहेब भोगडे, अप्पासाहेब कळके, मल्लिनाथ जोडभावी या पंचमंडळींसह महेश अंदेली, मोगले साडी सेंटरचे शिवकुमार मोगले, अरविंद येळदरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी वधूसाठी एक रेशीम साडी, रेशीम चोळीचा खण, वरासाठी जरीचे उपरणे आदी साहित्य घेण्यात आले. मोगलेंकडे हा चार पिढींचा मान असल्याचे शिवकुमार माेगले यांनी सांगितले. तत्पूर्वी गुरुवारी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा शुभारंभ श्री सिद्धरामेश्वर स्थापित अष्टविनायकांच्या पूजेने झाला. सकाळी साडेनऊ वाजता यास सुरुवात झाली.
 
पोगुल मळा येथील गणेशपूजेने सुरुवात होऊन दिवसभर शहराच्या विविध भागांत असलेल्या अष्टविनायकांची पूजा करण्यात आली. या वेळी बाळासाहेब भोगडे, अप्पासाहेब कळके, मल्लिनाथ जोडभावी, गिरीश गोरनळ्ळी, काशिनाथ दर्गोपाटील, अमृत कोनापुरे, सिद्धाराम पाच्छापुरे, ओम भोगडे यांची उपस्थिती होती. सर्व पूजांचे पौरोहित्य शिवयोग शास्त्री होळीमठ यांनी केले. गुरुवारपासून यात्रेच्या विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली असून, १४ जानेवारी संक्रांत आणि १५ जानेवारीला किंक्रांतीपर्यंत हे कार्यक्रम सुरू असणार आहेत. 
 
आज सकाळी दिवे लावण
 
रविवारी सकाळी साडेदहा वाजता पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडे दिवे लावण्याचा पारंपरिक कार्यक्रम होत अाहे. तसेच दक्षिण कसबा परिसर आणि बाळीवेस परिसरातील मानकऱ्यांच्या घरी दिवे लावण्याचा कार्यक्रम होईल. 
 
बातम्या आणखी आहेत...